मुंबई / प्रतिनिधी - काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आले. मात्र भाजपाच्या मंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले आहेत. एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरण उघड झाल्यानंतर एकनाथ खडसे यांना महसूल मंत्रिपदावरून हटवावे लागले आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडूनही मनमानी कारभार सुरु असल्याने भाजपाचा पारदर्शकतेचा बुरखा फाटत चालला आहे. मेहता यांच्या एम. पी. मिल एसआरए प्रकरणातील घोटाळ्याची माहिती भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना देण्यात आली आहे. याची गंभीर दखल घेत अधिवेशनानंतर प्रकाश मेहता यांची मंत्री पदावरून हकालपट्टी केली जाणार आहे.
गृहनिर्माण खात्याच्या मनमानी कारभारामुळे प्रकाश मेहता हे सातत्याने चर्चेत आहेत. ताडदेव येथील एम. पी. मिल कम्पाऊंड एसआरए प्रकरणात बिल्डराला सुमारे ५०० कोटी रुपयांचा फायदा होईल, असा निर्णय गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी घेतला होता. नगरविकास व गृहनिर्माण खात्याच्या कारभारासंदर्भात विरोधकांनी विधिमंडळात मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना, मेहता यांचा प्रस्ताव मी रद्द केलेला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मेहता यांनी सदर प्रस्तावावर, ‘मुख्यमंत्र्यांना अवगत केलेले आहे’, असे लिहिले होते. त्यामुळे मेहता यांनी, स्वतः सोबत मुख्यमंत्र्यांनाही अडचणीत आणले होते. मात्र सोमवारी स्वतः मेहता यांनीच, ‘मी मुख्यमंत्र्यांना अवगत केलेले नव्हते’, असे स्पष्ट केले. मेहता यांच्या या वादग्रस्त निर्णयामागच्या हेतूबाबत चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परंतु कोणामार्फत चौकशी होणार, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले नाही. या प्रकरणाबरोबर गेल्या काही दिवसांपासून मेहता यांच्या कारभाराबाबत मुख्यमंत्री फडणवीस व भाजपचे पक्षश्रेष्ठी हे त्यांच्यावर नाराज आहेत. तसेच या प्रकरणावर अंतिम निर्णय होण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव रद्द केला. त्यामुळे मेहता यांना सध्या तात्पुरते जीवदान मिळाले असले तरी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. या विस्तारात मेहता यांच्याकडील गृहनिर्माण खाते काढून त्यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.