
मुंबई - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यावरील आरोपांबाबत फॉरेन्सिक चौकशीसह एका महिन्यात संपूर्ण चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य अजित पवार यांनी एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार आणि मध्यस्थ यांच्यातील ऑडीओ क्लिपमधील संभाषण वाचून दाखविले. तसेच त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राधेश्याम मोपलवार यांच्यासंदर्भातील क्लिपमधील आवाजाबाबत फॉरेन्सिक चौकशी करून त्याची सत्यता पडताळून पाहिली जाईल. चौकशीअंती दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनीही यावेळी बोलताना मोपलवार यांच्यावर कारवाईची मागणी केली.