
मुंबई - शालेय अभ्यासक्रमात इतिहास शिकविताना त्यात प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा समावेश करण्यात येतो. तथापि, या माध्यमातून कोणाचीही बदनामी होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे सांगितले.
तावडे म्हणाले, इयत्ता नववीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यपूर्व काळाबरोबरच स्वातंत्र्यानंतरच्या सन २००० पर्यंतच्या ठळक घटनांचाही समावेश करण्यात आला आहे. या काळात विविध प्रधानमंत्र्यांच्या कार्यकाळातील निर्णय आणि घटनांचाही समावेश आहे. त्या अनुषंगाने तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या काळातील घटनांच्या उल्लेखाच्या अनुषंगाने बोफोर्स प्रकरणामुळे सरकार गेल्याचे म्हटले आहे. हा इतिहास सन २००० सालापर्यंतचाच असल्याने आणि राजीव गांधी यांच्या निर्दोषत्वावर त्यानंतर निर्णय झाल्याने त्याबाबत अभ्यासक्रमात उल्लेख आलेला नाही. यास्तव अशा घटनांमुळे कोणाचीही बदनामी होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात येत असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले.