
मुंबई, दि. 2 : राज्यातील शासकीय रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील रुग्णसेवा सक्षम करण्यावर भर असून, आवश्यक त्या सुविधा ग्रामीण भागासह शहरी भागात शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज विधानपरिषदेत दिली. अनंत गाडगीळ यांनी राज्यातील शासकीय रुग्णालयात तसेच ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी अपुऱ्या सुविधांबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ.सावंत म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा रुग्णालये-23, उप जिल्हा रुग्णालये(100 खाटा)-28, उप जिल्हा रुग्णालये(50 खाटा)-58, स्त्री रुग्णालये-13, इतर सामान्य रुग्णालये-4, ग्रामीण रुग्णालये-360 इतर रुग्णालय-1, ट्रामा केअर युनिट-44, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालये-2, मनोरुग्णालये-4, प्राथमिक आरोग्य केंद्र 1811 व उपकेंद्र 10580 असे एकूण 12928 आरोग्य संस्थामार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत.
सन 2016-17 मध्ये 64280 रुग्णांवर डायलेसिस उपचार करण्यात आले आहेत. राज्यातील वरील विविध आरोग्य संस्थांमध्ये 163 सोनोग्राफी मशीन असून त्यापैकी 160 कार्यान्वित आहेत. त्याचप्रमाणे विविध आरोग्य संस्थामध्ये 537-क्ष किरण मशीन असून त्यापैकी 515 कार्यान्वित आहेत.564963 इतक्या रुग्णाचे क्ष-किरण यंत्रामार्फत तपासण्या केल्या आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांबाबत राज्यातील आरोग्य संस्थामधील बायोमेडिकल उपकरणाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पुरवठा दाराची नियुक्ती करण्यात आली असून 1 डिसेंबर 2016 पासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासूनसेंट जॉर्ज रुग्णालयात आमदारांनादेण्यात येणारी औषधांची पुरवठा सेवा बंद करण्यात आली होती. आठ दिवसाच्या आत याबाबतची कार्यवाही सुरळीत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या लक्षवेधीमध्ये सदस्य प्रवीण दरेकर, राहूल नार्वेकर, रामहरी रुपनवर, हेमंत टकले यांनी सहभाग घेतला होता.
