
मुंबई - बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जीवन कार्याची माहिती देणारा ग्रंथ प्रकाशित करण्यात येईल असे आज वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांची २५ सप्टेंबर ही जन्मतारीख आहे. यानिमित्ताने अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात येणार असून याच दिवशी या ग्रंथाचे प्रकाशन करता येईल का, पूर्वीच्या ग्रंथात काही नवीन माहिती देता येईल का याची शक्यता तपासून पाहावी असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
विधानभवनातील वित्तमंत्र्यांच्या दालनात आज आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मराठी भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणी, साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांच्यासह विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. वाचकांची गरज लक्षात घेऊन मंडळाने त्यांची पुस्तके डिजिटल स्वरूपात देखील उपलब्ध करून दिले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. मुंबई आणि नागपूर येथील शासकीय मुद्रणालये अत्याधुनिक सामग्रीने युक्त केली पाहिजेत असे सांगताना त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
