उच्च न्यायालयाच्या आदेशाचा एसटी मंडळाला फटका
मुंबई । प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने मुंबईतील उड्डाणपुलाखालील ‘पे अँड पार्क’ योजना बंद केल्या नंतर आता दादर पुलाखालील चालवण्यात येणारे दादरचे एशियाड एसटी स्टँड बंद करण्याची नोटीस एसटी महामंडळाला पाठवली आहे. एसटी मंडळांला तोट्या बरोबरच कमी प्रवाश्यांची संख्या भेडसावत असताना आता एसटी स्टँडच बंद करण्याची वेळ आली आहे. दादर-एशियाड स्टँड उड्डाणपुलाखाली असल्याने पालिकेच्या उपमुख्य इंजिनीअर (वाहतूक) यांनी नुकतेच एसटीच्या कुर्ला विभाग अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. त्यात उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत इथल्या स्टँडची जागा लगोलग निष्कासित करण्यास सांगितले आहे. या पत्राने एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे.
एसटी महामंडळाचा शिवनेरी सेवांमुळे उच्चभ्रू वर्गाचीही पसंती मिळालेल्या या स्टँडच्या अस्तित्वावर पालिकेच्या या पत्रामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा स्टँड दादर टीटीकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपुलाखाली आहे. महापालिकेने पर्यायी म्हणून दिलेल्या जागेत काही वर्षांपासून तो उत्तमरीत्या चालत आहे. स्टँड बंद झाल्यास वा अन्यत्र स्थलांतरित झाल्यास हजारो प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागण्याची भीती आहे. तसेच, दादर-पुणे मार्गावरील सुपरिचित दादर-पुणे शिवनेरी सेवेसही धक्का बसण्याची शक्यता आहे. दादर-एशियाड स्टँड हा ‘पे अँड पार्क’ योजनेखाली नसून तिथून दिवसाला सुमारे १२ हजार प्रवाशांची ये-जा होते. प्रवाशांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या या सेवांमुळे एसटीलाही आर्थिक सहाय्य मिळत आहे. या स्टँडवर दररोज २३६ बसेस ये-जा करतात. त्यासह मुंबई सेंट्रल, परळहून येणाऱ्या बसेसच्या प्रवाशांसाठी हा थांबा आहे. त्यामुळे तो बंद झाल्यास वा अन्यत्र स्थलांतरित झाल्यास वाहतूक सेवेवर परिणाम होणार असून प्रवाश्यानाही याचा त्रास होणार आहे. दादर-एशियाडची यापूर्वी जागा कोहिनूर टॉवरजवळ होती. त्या बदल्यात महामंडळास उड्डाणपुलाकडील जागा देण्यात आली. ही जागा वापरात येताना झालेल्या करारानुसार एसटीतर्फे महापालिकेस १२.५० लाख रु. जाहिरात आणि सहा लाख रुपये भाडे स्वरूपात दिले जाते. मात्र या पत्रातील मसुद्याची अंमलबजावणी झाल्यास एसटी महामंडळास नुकसान होणार आहे.