मुंबई - माजी महापौर आणि भाजपच्या विद्यमान नगरसेविका शैलजा गिरकर (५८) यांचे रविवारी सायंकाळी ७:३० च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. शनिवारी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या होते. अभ्यासू नगरसेविका म्हणून त्यांची ओळख होती.
संसर्गजन्य तापामुळे त्यांनी शनिवारी सकाळी कांदिवली येथील ऑस्कर रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती काहीशी सुधारत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. यावेळी त्यांचे पती माजी राज्यमंत्री भाई गिरकर व चार डॉक्टरही तेथे उपस्थित होते. हृदयविकाराचा धक्का एवढा तीव्र स्वरूपाचा होता की, त्यांचं तात्काळ निधन झालं. कांदिवली पश्चिम मतदार संघातील प्रभाग क्रमांक २१ मधून त्या निवडून आल्या होत्या. गिरकर १९९७ पासून ते आतापर्यंत नगरसेवक म्हणून ५ वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या. त्यांनी २००१ ते २००३ या कालावधीत मुंबईचे उपमहापौरपद भूषवले होते. महिला व बालकल्याण, स्थापत्य समिती अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. पालिकेच्या स्थायी समितीच्या विद्यमान सदस्याही होत्या. त्यांच्या पश्चात पती माजी राज्यमंत्री भाई गिरकर, एक मुलगा व एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. प्रभागात त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. कांदिवली येथील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.