अंकुश ठेवण्यासाठी भरारी पथकाच्या निर्मितीची मागणी -
मुबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेने शहरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी क्लीन अप मार्शल हि योजना सुरु केली. एनजीओद्वारे चालवण्यात येणाऱ्या क्लीन अप मार्शलकडून नागरिकंना त्रास दिला जात असून मार्शलकडून वसुली केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्यावर हि योजना बंद करण्यात आली. त्यानंतर पुन्हा ही योजना सुरक्षा रक्षकांच्या कंपन्यांना दिली असून आताही मोठ्या प्रमाणात दमदाटी करुन नियमबाह्य पैसे उकाळणे, धमक्या देणे असे प्रकार वाढू लागले आहेत. यामुळे या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पालिकेकडून मात्र असे प्रकार घडल्यास पोलिसांत तक्रार नोंदवा असा सल्ला देऊन आपली जबाबदारी ढकलण्याचा प्रयन्त सुरु असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
मुंबईतील पर्यटन स्थळ, रेल्वे स्थानक व गर्दीच्या ठिकाणी थुंकणाऱ्या, कचरा फेकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वर्षभरापूर्वी ७५३ क्लिनअपमार्शलची पालिकेने नियुक्ती केली. महापालिकेच्या २४ विभागामध्ये २२ खासगी संस्थांना कंत्राट देण्यात आली. या योजनेची वर्षभराने संपल्याने मुदत वाढ देण्यात आली. मागील एक वर्षाच्या कालावधीत क्लिनअप मार्शल विरोधात नागरिकांच्या अनेक तक्रारींची नोंद पालिकेकडे केली जाते. मात्र, त्यांच्यावर कारवाईच केली जात नसल्याने त्यांचा मुजोरीपणा वाढला आहे. नुकताच मुलुंड (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेर एका नागरिकाने या क्लीन अप मार्शलच्या दादागिरीचा अनुभव घेतला. संबंधित व्यक्तिशी दादागिरी करुन त्याच्याकडून नियमबाह्य पैसे वसूली केली जात होती. मात्र या वसूलीला त्या व्यक्तिने विरोध केल्याने मार्शलची थेट कॉलर पकडण्याची मजल गेली. क्लिन- अप मार्शलाचा रुद्रावतार पाहून प्रवाशी घाबरुन तेथून निघून गेला. त्यानंतर तेथे प्रत्यक्षदर्शी असलेल्या प्रवाशाने याचा जाब मार्शलला विचारला असता त्याने समाधानकारक उत्तर न देता आमचं आम्ही बघून घेवू, 'आम्ही गाववाले आहोत' असे अरेरावीचे उत्तर दिले. दरम्यान, रस्त्यावर थुंकल्यानंतर निमयानुसार दंड आकारण्याचा नियम आहे. मात्र, क्लिन- अप मार्शलकडून दमदाटी करुनच पैसे उकळले जातात. लोकही या दशहतीला घाबरत असल्याने त्यांच्याविरोधात तक्रारी करण्यास पुढे येत नाहीत. पुरावे नसल्याने पालिकेचे अधिकारीही तुम्ही पोलिसांत तक्रार करा, असा सल्ला देवून हात वर करीत असल्याने लोकांमध्ये संतापाच्या प्रतिक्रिया आहेत. दरम्यान नागरिकांना धमकावणाऱ्या आणि नागरिकांकडून जबरदस्ती वसुली करणाऱ्या क्लीन मार्शलवर देखरेखीसाठी आणि त्यांच्यावर कारवाईसाठी पालिकेने एखाद्या भरारी पथकाची निर्मिती करावी अशी मागणी केली जात आहे.
पोलिसांत तक्रार करावी -
क्लिन- अप मार्शलांनी दंड आकारण्याचे नियम घालून दिले आहेत. मात्र, दंडूकशाहीचा वापर करुन पैसे उकाळले जात असल्यास लोकांनी पोलिसांत तक्रार करावी. पोलिसांतील तक्रारीची माहिती पालिकेला द्यावी, त्या तक्रारीनुसार क्लिन- अप मार्शलवर कारवाई करता येईल.
- किशोर गांधी, सहाय्यक पालिका आयुक्त, "टी" वॉर्ड मुलुंड
- किशोर गांधी, सहाय्यक पालिका आयुक्त, "टी" वॉर्ड मुलुंड
