मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालय आणि कूपर रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे किमान वेतनासह इतर मूलभूत हक्क डावलले जात असल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी कामगार संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. ऐन दिवाळीच्या तोंडावर आंदोलन होणार असल्याने रुग्णालयातील सेवेवर आणि स्वच्छतेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून महापालिका मुख्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. श्रमजीवी कामगार संघटनेचे प्रमुख माजी आमदार विवेक पंडित हे स्वतः या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.
कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय, कूपर रूग्णालयातील सफाई व अन्य कंत्राटी कामगार हे श्रमजीवी कामगार संघटनेचे सभासद आहेत. या कामगारांच्या न्याय्य हक्काच्या मागण्यासाठी गेले सहा ते सात महिने श्रमजीवीचे पदाधिकारी आणि कामगार प्रतिनिधी सातत्याने निवेदन, आंदोलन अशा विविध मार्गाने पाठपुरावा करीत आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नाही. कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अन्य कायदेशीर लाभही अजून पर्यंत दिले गेलेले नाहीत. एनजीओ या नावाने स्वयंसेवक कामगार असा अजब फॉर्म्युला वापरून महापालिकेचे काही अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने मोठा घोटाळा करून कामगारांचे शोषण करत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. दररोज प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारांची हॉस्पिटल प्रशासन, महापालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्याकडून पिळवणूक आणि शोषण निषेधार्थ आहे. प्रशासनाने कामगारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा संघट्नेने दिला आहे.