मुंबई । प्रतिनिधी -
पश्चिम रेल्वेवर बिना तिकीट प्रवास करणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांविरोधात सप्टेंबर महिन्यात अभियान चालवण्यात आले. या अभियानादरम्यान तिकीटापेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणे, बिना तिकीट प्रवास करणे, बुकिंग न करता सामान घेऊन प्रवास करणे, अनधिकृत फेरीवाले अश्या विविध प्रकरणात कारवाई करून तब्बल 7 कोटी रुपयांच्या दंडाची वसूल करण्यात आली आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी याच कालावधीत 5.45 टक्के जास्त दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली.
पश्चिम रेल्वेवर सप्टेंबर महिन्यात 1 लाख 83 हजार प्रकरणात कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान 7.19 लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. दलाल आणि असामाजिक तत्वांविरोधात 218 वेळा कारवाई करण्यात आली यात 175 लोकांना पकडण्यात आले. त्यांच्यावर रेल्वेच्या विविध कलमांनुसार केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. या अभियाना दरम्यान 876 भिकाऱ्यांवर व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून 150 व्यक्तींना कारागृहात पाठवण्यात आले आहे. महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या 12 वर्षाहून अधिक वयाच्या 55 शालेय विद्यार्थ्यांना पकडण्यात आले असून त्यांना त्या डब्यातून प्रवास न करण्याची सूचना देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवर वेळोवेळी अश्या प्रकारच्या कारवाई करण्यात येते. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊन प्रवास केल्यास रेल्वेच्या महसुलात वाढ होऊन चांगल्या सुविधा देणे शक्य आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊन सन्मानाने प्रवास करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.