तर चौकशी अधिकाऱ्यांवरच कारवाई - आयुक्तांची ताकीद
मुंबई । प्रतिनिधी 14 Nov 2017 -
मुंबई महानगरपालिकेत गेल्या काही वर्षात नाले सफाई, डेब्रिज आणि रस्ते घोटाळा गाजला होता. या गाजलेल्या घोटाळ्यांपैकी रस्ते घोटाळ्यात दोषी आढळलेल्या अधिका-यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी दिरंगाई केली जात आहे. पालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत संबंधित अधिका-यांनी कारवाईसाठी मुदत मागीतली आहे. या मुदतीत चौकशीची प्रक्रिया पूर्ण करून 31 जानेवारी 2018 पर्यंत कारवाईचा अहवाल पालिका आयुक्तांना सादर करण्याचे मान्य करण्यात आले आहे. मात्र या मुदतीत चौकशी पूर्ण न झाल्यास चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीद पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेच्या 234 रस्त्यांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यात दोषी असणा-य़ा कंत्राटदार व अधिका-यांवर दोन टप्प्यात कारवाई करण्य़ाचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात 34 रस्त्यांची चौकशी करून त्यात दोषी आढळलेल्या कंत्राटदारांवर कारवाई करण्य़ात आली. उर्वरित 200 रस्त्यांच्या चौकशी अहवालातही दोषी कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. रस्ते कामांत संबंधित अभियंते, अधिका-य़ांचीही तेवढीच जबाबदारी होती. त्यामुळे त्यांचीही चौकशी करून त्यात दोषी आढळणा-या अभियंते, अधिका-यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्य़ावर कारवाई करण्याचा निर्णय़ प्रशासनाने घेतला. या चौकशीची जबाबदारी उपायुक्त रमेश बांबळे व चौकशी अधिकारी राजेंद्र रेऴेकर यांना देण्यात आली. मात्र वर्षभराचा कालावधी लोटला तरी चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही.
चौकशी धिम्यागतीने सुरु असल्याने आयुक्त मेहता यांनी याबाबत बांबळे व रेळेकर यांच्यासोबत बैठक घेऊन चौकशीच्या दिरंगाईबाबत खुलासा मागितला. यावेळी बांबळे व रेळेकर यांनी यासाठी मुदत मागितली असून या मुदतीत चौकशी पूर्ण करण्याचे मान्य केले आहे. या मुदतीत चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर तुमच्यावरच कारवाई केली जाईल असे आयुक्तांनी या बैठकीत स्पष्ट केले आहे. तशाप्रकारची समज बांबळे व रेळेकर यांना पत्राद्वारेही देण्यात आली आहे. त्यामुळे बांबऴे व रेळेकर यांना चौकशीची प्रक्रिया पूर्ण करून 31 जानेवारी 2018 पर्यंत कारवाईचा अहवाल पालिका आयुक्तांना सादर करावा लागणार असल्याने या दोन्ही अधिकाऱ्यांची पळापळ सुरु आहे.
अशी असेल मुदतवाढ -
34 रस्ते कामांमधील 100 दोषींची चौकशी पूर्ण झाली. मात्र अजूनही दुस-या टप्प्यातील 200 रस्त्यांच्या कामांतील 170 दोषींची चौकशी प्रक्रिया अद्याप पूर्ण व्हायची आहे. त्यासाठी शहरातील रस्त्यांच्या कामांतील दोषींच्या कारवाईसाठी 22 नोव्हेंबर पर्यंत मुदत मागीतली आहे. पूर्व उपनगरांतील रस्त्यांच्या कामांच्या चौकशीसाठी 30 नोव्हेंबर तर पश्चिम उपनगरांतील 9 डिसेंबरपर्यंत मुदत मागण्यात आली आहे. तर 31 जानेवारी 2018 रोजी कारवाईचा अंतीम अहवाल आयुक्तांना सादर करावा लागणार आहे.