Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र भाजपामुक्त करू - आमदार अल्पेश ठाकोर


ठाणे - गुजरातमध्ये माजलेला अनाचार संपवण्यासाठी मी, जिग्नेश आणि हार्दिकने झंझावात निर्माण केला होता. त्यामुळेच भाजपची गुजरातमध्ये पिछेहाट झाली आहे. भाजपच्या एकाधिकारशाहीमुळे देशातील संसदीय लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उभारलेल्या लढय़ाला साथ देऊन महाराष्ट्र भाजपमुक्त करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

मुंब्रा येथील मित्तल ग्राउंडवर आयोजित केलेल्या देशातील सर्वात मोठ्या मुशायराला अल्पेश ठाकोर यांनी भेट दिली. या प्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड, ज्येष्ठ नगरसेवक शानू पठाण, कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शमीम खान, राजन किणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली. देशात अराजकता माजली असून दलित, अल्पसंख्याक वर्ग दहशतीखाली जगत आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली होत आहे. ठरावीक वर्गाच्या हितासाठी बहुसंख्याक जनतेला वेठीस धरले जात आहे. हा प्रकार संविधानाला धोकादायक आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. राक्षसी बहुमताच्या जोरावर जनविरोधी नीतींचा अवलंब केला जात असल्यामुळेच संसदीय लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच माझ्यासोबत जिग्नेश मेवानी आणि हार्दिक पटेल यांनी भाजपला गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत आव्हान दिल्याने त्यांची पीछेहाट झाल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. 

या देशातील भ्रष्टाचाराविरोधात गळे काढून आणि थापेबाजी करून सत्ता मिळवलेला भाजपाच आता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात हे प्रथमच होत आहे. आपले पंतप्रधान लाखो रुपयांचे मशरूम खात आहेत. मात्र, देशातील कोट्यवधी जनतेला आपली भूकही भागवता येत नाही. खोटं बोलून जनतेची फसवणूक करण्याची हातोटी या सरकारला गवसली आहे. परंतु जनता वारंवार नाही तर एकदाच फसते. या सरकारची भ्रष्टाचारी वृत्ती, थापेबाजी आम्ही उघड करून सत्ताधाऱ्यांचा खोटेपणा उघडकीस आणणार असल्याचेही ते म्हणाले. आव्हाड यांनी संविधान आणि संसदीय लोकशाहीसाठी उभारलेला लढा बघूनच आम्ही मैदानात उतरलो आहोत आणि आता त्यांच्या साथीने महाराष्ट्रातही हा लढा आम्ही उभारणार आहोत, असा दावाही त्यांनी केला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom