विधीमंडळ अधिवेशनासाठी सुरक्षेसह आवश्यक सुविधांना प्राधान्य - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विधीमंडळ अधिवेशनासाठी सुरक्षेसह आवश्यक सुविधांना प्राधान्य

Share This

नागपूर, दि. 10 : महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त सुरक्षेसह आवश्यक सुविधांची कामे प्राधान्यांने पूर्ण करतानाच परिसरात गर्दी होणार नाही, यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना अधिवेशनासाठी करावयाच्या व्यवस्थेबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत देण्यात आल्या. 

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभा, मंत्री परिषद दालनात सर्व संबंधित विभाग प्रमुखांकडून व्यवस्थेचा आढावा घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी सूचना दिल्या. यावेळी विधीमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे उपस्थित होते.

विधानसभा परिसर व बाह्यसुरक्षेसाठी पोलीस विभागातर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेनुसार आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच आमदार निवास व विधानभवन येथे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मुंबईच्या धर्तीवर विधानभवन परिसरात अभ्यागतांना प्रवेश देण्यात यावा. त्यामुळे परिसरातील गर्दी नियंत्रित करता येईल. शिष्टमंडळ यांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार प्रवेश देण्यात यावा, याबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

विधानभवन परिसर, आमदार निवास, रवी भवन, सुयोग निवासस्थान आदी परिसरातील सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीज व्यवस्था याबाबीकडे सगळ्यांनी गांभिर्यपूर्वक लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे सुयोग पत्रकार निवास, आमदार निवास, 160 गाळे, हैद्राबाद हाऊस याठिकाणी सर्व सोयी उपलब्ध करुन द्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बागडे म्हणाले की, विधानसभा परिसरातील फिक्स पॉईंटवर पोलिसांनी लक्ष द्यावे, विधानसभा परिसरात कामासाठी येणाऱ्यांनी आपले काम झाल्यावर न थांबता निघून जातील, यासाठी पोलीस यंत्रणांनी लक्ष द्यावे. येणाऱ्यांच्या वेळा ठरवून द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या. लोकप्रतिनिधी, शिष्टमंडळासोबत येणाऱ्यांच्या गर्दीला आळा बसावा, यासाठी लोकप्रतिनिधी व शिष्टमंडळांनी मोजकेच प्रतिनिधी विधानभवन परिसरात कामासाठी येतील, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

नाईक-निंबाळकर व बागडे यांनी विधानपरिषद, सुयोग पत्रकार निवास येथे भेट दिली. यावेळी शिबीर प्रमुख दिलीप जाधव यांनी सभापती व अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अध्यक्ष व सभापतींनी पत्रकारांशी औपचारिक चर्चा केली. माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, उपसंचालक मोहन राठोड व माहिती विभागातील अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर सभापती व अध्यक्षांनी आमदार निवास परिसराची पाहणी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages