
मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेचे आधुनिक संकेतस्थळ व अँप यांचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आला. मात्र महापालिकेच्या या कार्यक्रमाला पालिकेचे ट्रस्टी असलेले नगरसेवक, सर्व पक्षीय गटनेते, उप महापौर एवढेच नव्हे तर मुंबईचे प्रथम नागरिक महापौर यांनाही निमंत्रण देण्यात आलेले नव्हते.नव्हे हे सर्वजण बेखबर होते. सत्ताधारी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनाही याबाबतची माहिती नसल्याचे समजते.पालिका आयुक्तांकडून पालिकेच्या कामकाजासंदर्भातील निर्णय पालिकेतील नगरसेवकांना अंधारात ठेऊन घेतले जात असल्याबद्दल विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सांगितले. हा केवळ महापौरांचा अवमान नसून पालिकेतील सर्व नगरसेवकांचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना चांगल्या सेवा देण्याच्या उद्देशाने MCGM 24 x 7 यामोबाईल ॲपचा तसेचआणि One MCGM GIS या संकेतस्थळाचा सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ केला. मात्र पालिकेच्या या कार्यक्रमाची माहिती न देता महापौर तसेच पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांना अंधारात ठेवले .आयुक्तांच्या या एकाधिकारशाहीविरोधात सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी दंड थोपटले असून या प्रकरणी आयुक्तांना जाब विचारण्यात येणार असल्याचे सेना नेत्यांनी सांगितले. तर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असता त्यांनी अशा प्रकारे पालिकेचे कार्यक्रम हायजॅक करणे योग्य नसल्याचे सांगितले. पालिका आयुक्तांकडून नागरसेवकांना अंधारात ठेऊन पालिका संदर्भातील कार्यक्रम शासनाच्या सह्याद्री अतिथीगृहात करणे चुकीचे असून याबाबत पालिका आयुक्तांना जाब विचारू असा इशारा रवी राजा यांनी दिला आहे.