
मुंबई । प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिकेच्या 'ई' विभागात घोडपदेव परिसरात असणा-या 'हिराबाई कंम्पाऊंड' मधील भूखंड क्रमांक ७ वर 'चायना' या नावाची ७ मजली अनधिकृत इमारत वर्ष २०१३ मध्ये उभारण्यात आली होती. ही अनधिकृत इमारत निष्कासित करण्याची कार्यवाही महापालिकेच्या 'इ' विभाग कार्यालयाच्या स्तरावर वर्ष २०१३ पासूनच सुरु होती. याबाबत शहर दिवाणी न्यायालयाने इमारत निष्कासित करण्याच्या दिलेल्या आदेशांबाबत सादर झालेले अपील उच्च न्यायालयाने ५ फेब्रुवारीला फेटाळले होते. यानुसार मुंबई पोलीसांच्या विशेष सहकार्याने व सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप शिंदे यांच्या उपस्थितीत आजपासून सुरु झालेल्या कारवाई दरम्यान पुढील २ दिवसात सदर इमारत पूर्णपणे तोडण्यात येऊन भूखंड मोकळा करण्यात येईल, अशी माहिती 'ई' विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड यांनी दिली आहे.
'परिमंडळ १' चे उपायुक्त सुहास करवंदे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान घोडपदेव परिसरातील हिराबाई कम्पाऊंडमधील भूखंड क्रमांक ७ या सुमारे ७०० चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर 'चायना' ही अनधिकृत इमारत उद्भवली होती. या अनधिकृत इमारतीमध्ये ७२ निवासी गाळे, तर तळमजल्यावर ३ व्यवसायिक गाळे; यानुसार एकूण ७५ गाळ्यांचा समावेश होता. ही इमारत अत्यंत चिंचोळ्या मार्गावर असल्याने या ठिकाणी बुलडोजर, जेसीबी यासारखी यंत्रसामुग्री नेणे शक्य नाही. ज्यामुळे हे काम मजुरांच्या व गॅस कटरच्या सहाय्याने करण्यात येत आहे. या कामासाठी तोडकाम करणा-या कंत्राटदाराच्या ५० मजुरांसह महापालिकेचे १० कर्मचारी घटनास्थळी कार्यरत आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप शिंदे यांच्या व भायखळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अविनाश शिंगोटे यांच्या नेतृत्वात ७५ पोलीसांचा ताफा घटनास्थळी तैनात आहे. विशेष म्हणजे परिसरातील संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन या़ ताफ्यात २३ महिला पोलीसांचाही समावेश आहे, अशीही माहिती साहेबराव गायकवाड यांनी दिली आहे.