
मुंबई । प्रतिनिधी - ब्रिटीशांच्या काळापासूनचा अडीच तासाचा सक्तीचा लंच टाईम बंद करून अभियंत्यांच्या कामाच्या वेळा निश्चित करण्याच्या मागणीसाठी पालिकेतील अभियंत्यांनी येत्या १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. आठ तासाचे वेळापत्रक लागू होई पर्यंत केवळ कार्यालयीन वेळेतच काम करण्याचा इशारा अभियंत्यांच्या दोन्ही संघटनांनी दिला आहे.
पालिकेच्या बहुतांशी विभागात गेल्या अनेक वर्षांपासून दुपारी १२ ते अडीच पर्यंत लंच टाईम दिला जातो. मात्र ही पद्धत बंद करून सलग आठ तासाची ड्युटी लावावी अशी अभियंत्यांची मागणी आहे. या मागणीसाठी म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन आणि बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियन या दोन्ही संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आठ तासाची ड्युटी होत नाही तोपर्यंत अभियंत्यांनी कार्यालयीन वेळेतच काम करावे आणि पूर्ण लंच टाईम वापरावा असेही आवाहन संघटनेने केले आहे. आताच्या काळात अडीच तासाचा लंच टाईमची पद्धत योग्य नाही. अनेक अभियंते हे उपनगरातून, ठाणे जिल्ह्यातून येतात. त्यामुळे त्यांचे ड्युटीचे १२ ते १४ तास होतात. आतापर्यंत अभियंते लंच टाईम पूर्ण न घेता कामावर रुजू होत होते. मात्र आता बायोमेट्रीकमुळे कर्मचाऱ्यांना वेळ पूर्ण होईपर्यत थांबावे लागते. या विरोधात हे आंदोलन केले जाणार असल्याचे युनियनचे साईनाथ राजाध्यक्ष यांनी सांगितले.