सॅप बंद पडल्याने बायोमॅट्रिक हजेरीसाठी पालिका मुख्यालायत रांगा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 March 2018

सॅप बंद पडल्याने बायोमॅट्रिक हजेरीसाठी पालिका मुख्यालायत रांगा


मुंबई | प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेत बायोमॅट्रिक हजेरीमुळे वादंग निर्माण झाला आहे. हजारो कर्मचाऱ्यांचा पगार कापला गेला असताना आता पालिकेची सॅप प्रणाली बंद पडल्याने बुधवारी पालिका कर्मचाऱ्यांना आपली हजेरी लावता आलेली नाही. यामुळे पालिकेच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत.

मुंबई महानगर पालिकेत सॅप प्रणाली द्वारे सर्व कामे केली जातात. पालिकेच्या निविदा काढण्यापासून कर्मचाऱ्यांची हजेरी सुद्धा सॅपद्वारे बायोमॅट्रिक मशीनच्या माध्यमातून लावली जाते. बायोमॅट्रिक मशीनमध्ये अनेक त्रुटी असल्याने कर्मचाऱ्यांची हजेरी योग्य प्रकारे लागली नसल्याने प्रशासनाने तब्बल 40 हजार कर्मचाऱ्यांचा पगार कापला होता. बायोमॅट्रिक हजेरीच्या पद्धतीत चुका असल्याने आपला पगार कापला गेला असल्याचा आरोप केला आहे. त्यातच बुधवारी वरळी हब येथील सॅप प्रणालीसाठी लागणारी ऑप्टिकल फायबर वायर तुटल्याने पालिकेच्या अनेक कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना हजेरी लावता आलेली नाही. पालिकेच्या सॅप प्रणालीवर चालणाऱ्या बायोमॅट्रिक मशीन बंद असताना वायफाय, मोबाईल सिमकार्डवर चालणाऱ्या मशीन सुरू असल्याने कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सॅपचा फटका पालिका मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. पालिका मुख्यालयातील सर्वच हजेरीच्या मशीन बंद होत्या मात्र पालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त कार्यालयातील मशीन सुरू असल्याने कर्मचारी अधिकाऱ्यांनी लांबच लांब रांगा लावून हजेरी लावली. सायंकाळपर्यंत सॅप प्रणाली सुरू नसल्याने कर्मचारी अधिकाऱ्यांनी पुन्हा रांगा लावून थंब करून आपले घर गाठले.

Post Bottom Ad

JPN NEWS