डीनची भेट न झाल्याने आंदोलन मागे -
मुंबई | प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आली. मात्र या बायोमॅट्रिक मशीनचा कर्मचाऱ्यांना बसला असून, 40 हजार कर्मचाऱ्यांचे पगार कापण्यात आले आहेत. याविरोधात आज पालिकेच्या केईएम रुग्णालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी बायोमॅट्रिक हजेरी बंद करावी अशी मागणी करण्यात आली. मात्र या आंदोलनकर्त्याना डीन अविनाश सुपे भेटले नसल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
बायोमेट्रिक हजेरीत योग्य प्रकारे नोंद न झाल्याने नर्स आणि कर्मचाऱ्यांचा पगार कापण्यात आला आहे. दर महिन्याच्या १ तारखेला नर्स , कर्मचारी विभाग यांचा पगार होतो. पण, ७ तारीख येऊनही कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत. तसेच ज्यांचा पगार झाला, त्यांचा ही कापण्यात आला आहे. या सर्वासाठी बायोमेट्रिक हजेरी पद्धत जबाबदार असल्याचा आरोप करत ही पद्धत बंद करा अशी मागणी काही नर्स स्टाफनी केली आहे. जोपर्यंत ही बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद होत नाही, तोपर्यंत असंच एकत्र जमून निषेध करण्यात येणार असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. केईएम रुग्णालयात जवळपास १५ हजार कर्मचारी वर्ग आहे. पण, त्यांच्यासाठी या मशीन्स कमी पडतात. त्यामुळे जरी वेळेवर पोहोचलो तरी आधीच हजेरीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अर्धा तास हजेरीसाठीच जातो. त्यामुळे अर्ध्या तासाचा ही पगार कापला जातो असा आरोप रुग्णालयातील नर्सनी केला आहे. बायोमॅट्रिक हजेरीमुळे कर्मचारी त्रस्त असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आंदोलन केल्याचे सांगण्यात आले आहे.