सॅनिटरी नॅपकीनच्या व्यवस्थापनासाठी मंत्रालयात इनसिनिरेटर मशीन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सॅनिटरी नॅपकीनच्या व्यवस्थापनासाठी मंत्रालयात इनसिनिरेटर मशीन

Share This
मुंबई -  सॅनिटरी नॅपकीनचे विघटन करणारी इनसिनिरेटर मशीन मंत्रालयातील काही महिला शौचालयांमध्ये बसविण्यात आली आहे. वापर केलेल्या सॅनिटरी नॅपकीनच्या कचऱ्याचे सुलभ व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने इनसिनिरेटर मशीन महत्त्वाची आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर मंत्रालयातील दोन महिला शौचालयांमध्ये ती बसविण्यात आली असून ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज त्याचे उद्घाटन करण्यात आले.

मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या, महिलांच्या मासिक पाळीच्या काळात नॅपकीनचा वापर वाढत आहे. शासनानेही अस्मिता योजनेच्या माध्यमातून किशोरवयीन मुली आणि महिलांना कमी दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे वापर केलेल्या सॅनिटरी नॅपकीनच्या कचऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. तो सोडविण्यासाठी अशा प्रकारच्या मशीन महत्त्वाच्या ठरणार आहेत.

८ मार्च या जागतिक महिला दिनी शासनाच्या वतीने अस्मिता योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. अस्मिता योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील किशोरवयीन मुलींना 5 रुपयांत ८ सॅनिटरी नॅपकीनचे पाकीट मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 7 लाख मुलींना याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे सॅनिटरी नॅपकीन मोठ्या प्रमाणात वापरले जाणार आहेत. आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकीन विघटन करणे आवश्यक असल्याने अशा मशीन व अशा तंत्रज्ञानाचे परीक्षण करण्यासाठी या मशीन सुरूवातीला मंत्रालयात बसविण्यात आल्या आहेत. विविध कॉर्पोरेट कंपन्या सीएसआरमधून अशा मशीन बसविण्यासाठी पुढे येत आहेत.

मंत्रालयातील विस्तारित इमारतीमधील चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर बसविण्यात आलेल्या इनसिनिरेटर मशीनचे उद्घाटन आज करण्यात आले. निर्मल रक्षा अभियान प्रकल्पांतर्गत सिल्वरेज युटोपीअन कंपनी प्रा. लि. ने ही मशीन दिली आहे. या कंपनीने अहमदनगर, नागपूर,पुणे या ठिकाणी इनसिनिरेटर मशीन मोफत दिल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी निर्मल रक्षा अभियानांतर्गत ही कंपनी काम करीत आहे. मंत्रालयात उद्घाटनप्रसंगी ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, सिल्व्हरेज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पिनल वानखेडे, ऐश्वर्या वानखेडे, अर्चना मोहिते यांची उपस्थिती होती.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages