मुंबई | प्रतिनिधी - मुंबई महापालिकेचे माहीम धारावी येथे नेचर पार्क आहे. नेचर पार्क वाचवण्यासाठी पर्यावरणवादी प्रयत्न करत असताना आता शिवसेना आक्रमकी झाली आहे. नेचर पार्क वाचवण्यासाठी शिवसेना भविष्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा युवा सेना अध्यक्ष व शिवसेनेचे नेते आदीत्य ठाकरे यांनी दिला. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली हा भूखंड विकासकाच्या घशात घालण्याचा डाव मुख्यमंत्र्यांना माहित होता का नव्हता याबाबत त्यांनी खुलासा करावा अशी मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. या मुद्द्यावर शिवसेनेने स्थायी समितीत प्रश्न उपस्थित करून याचा निषेध करत झटपट सभा तहकुबीची मागणी केली. याला विरोधीपक्षाने समर्थन केले. दरम्यान या मुद्द्यावर शिवसेना -भाजपमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी नेचर पार्कला भेट देऊन दिलेल्या इशा-यानंतर पालिकेतील स्थायी समितीतही सभागृह नेते यशवंत जाधव यांनी नेचर पार्क एसआरए योजनेच्या नावाखाली येथील भूखंड एका बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट एमएमआरडीएने घातला आहे, असा आरोप करीत सभा तहकूबीची मागणी केली. या मागणीला विरोधी पक्षांने जोरदार समर्थन केले. त्यामुळे सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे नेचर पार्कच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपा आमने सामने येण्याची शक्यता आहे. आदीत्य ठाकरे यांनी सकाळी नेचर पार्कला भेट देऊन पहाणी केली. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि पालिका सभागृह नेते यशवंत जाधव उपस्थित होते. या ठिकाणी डम्पिंग ग्राऊंड होते. मात्र आता परवडणारी घरे निर्माण करण्याच्या नावाखाली सरकार बिल्डरचा फायदा करायला निघाली. त्यामुळे शिवसेना त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नसल्याचे सांगत आम्ही रस्त्यावर उतरून याला विरोध करू असे ठाकरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे आरेतील कारशेडसाठी पालिकेच्या विकास आराखड्यात हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. आम्ही त्या रद्द केल्याचे सांगत आदीत्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. एकीकडे सरकार झाडे लावण्याबाबत मोहीम राबवत आहे, मात्र जंगल कापण्याचे काम देखील इथूनच होत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला. त्यामुळे नेचरपार्कवरून येत्या काळात शिवसेना - भाजपमध्ये जोरदार जुंपणार आहे.