मुंबई । प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतंर्गत करावयाच्या अर्जाची मुदत वाढविण्यात आली असून ती ७ मार्च २०१८ असे करण्यात आली असल्याचे महापालिकेच्या शिक्षण विभागाने कळविले आहे.
शेक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (RTE) अंतर्गत पात्र खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील (अल्पसंख्याक शाळां वगळून) प्रवेशाच्या सुरुवातीच्या वर्गात (entry level) वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठी राखीव प्रवेशाच्या २५ टक्के जागा ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेच्या प्रणालीव्दारे दि. १० फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत भरण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात येत असल्याबाबत शासनाकडून व बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कळविण्यात आले होते. तथापि महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या निर्देशानुसार तारखेत बदल करण्यात आला असून दिनांक ७. मार्चपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. अधिक माहितीकरिता महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
