शिवस्मारकाचे काम पावसाळ्यापूर्वीच सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 March 2018

शिवस्मारकाचे काम पावसाळ्यापूर्वीच सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


मुंबई, दि. १ : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुरू करण्यासंदर्भातील लेटर ऑफ एक्सेप्टन्स आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मारकाचे काम करण्यासाठी नेमलेल्या एल अँड टी कंपनीला देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जागतिक किर्तीचे स्मारक लवकरात लवकर व्हावे. यासाठी कंपनीने काम पावसाळ्यापूर्वीच सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी एल अँड टी कंपनीचे संचालक एम. व्ही. सतीश व सुशांत शहादेव यांच्याकडे हे पत्र सुपुर्द केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते. यावेळी स्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण आशिषकुमार सिंह यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. गेल्या 15 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. हे सरकार आल्यानंतर आमदार विनायक मेटे यांना स्मारक समितीचे अध्यक्ष करून कामाला गती दिली. राज्य शासनाने अतिशय जलदगतीने काम करत या स्मारकासाठी लागणारे सर्व परवाने आणले आणि आज एल अँड टी या कंपनीला काम सुरू करण्यासंदर्भातील पत्र देण्यात आले. जागतिक किर्तीचे हे स्मारक होणार असून एल अँड टी कंपनीला या कामामुळे वेगळी उंची प्राप्त होणार आहे. कंपनीने पावसाळ्यापूर्वीच स्मारकाचे काम सुरू करावे. तसेच अतिशय वेगाने संपूर्ण स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. कमी कालावधीत जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचे वैशिष्ट्यपूर्ण कामही कंपनीला करण्यास मिळाले आहे.

स्मारकाचे काम सुरू करण्यासाठी व सर्व परवाने मिळविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मेहनत घेतली आहे. स्मारक लवकरात लवकर पूर्ण करून भारत अत्युच्च दर्जाचे काम करू शकतो, हे जगाला दाखवून द्यावे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS