
मुंबई । प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात असणा-या मिठी नदीतील पाणी स्वच्छ करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. हे प्रयत्न प्रामुख्याने चार टप्प्यामंध्ये विभागण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात मिठी नदीच्या उगमापासून १ हजार ६५० मीटर अंतरावर जल प्रक्रिया केंद्र (STP) उभारण्याची निविदा प्रक्रिया यापूर्वीच सुरु झाली आहे. हे केंद्र उभारण्यासाठी सुमारे १२० कोटी रुपये एवढा खर्च अंदाजित आहे. या केंद्राद्वारे दररोज सुमारे ८० लाख लीटर पाण्यावर प्रक्रिया करुन ते मिठी नदीच्या प्रवाहात सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर मिठी नदीच्या पात्राच्या जवळपासच्या परिसरातील सांडपाणी व मलजल वाहून नेण्यासाठी अधिक सक्षम व्यवस्था तयार करण्याची प्रक्रिया देखील महापालिकेच्या संबंधित खात्यांद्वारे करण्यात येणार आहे, जेणेकरुन मिठी नदी अधिकाधिक स्वच्छ राहण्यास मदत होईल. यानुसार मिठी नदीतील पाणी स्वच्छ करण्यासाठीच्या पहिल्या टप्प्यास महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नुकतीच प्रशासकीय मंजूरी दिली असून उर्वरित तीन टप्प्यांना देखील तत्वत: प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे, अशी माहिती मुंबई मलनिःसारण प्रकल्पाचे प्रमुख अभियंता महेश ठाकूर यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील महत्त्वाची नदी असणा-या मिठी नदीची एकूण लांबी १७.८४ किलोमीटर एवढी आहे. यापैकी ११.८४ किमी लांबीची नदी ही महापालिकेच्या अखत्यारितील भागात असून उर्वरित ६ किमी लांबीची नदी ही 'मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण' यांच्या अखत्यारित येते. या नदीचे पाणलोट क्षेत्र (Catchment Area) हे साधारणपणे ७ हजार २९५ हेक्टर एवढे आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असणा-या विहार आणि पवई तलावांमधून होणारा विसर्ग हा या नदीचा प्रमुख जलस्रोत आहे. मिठी नदीच्या जवळपासच्या परिसरातून नदीमध्ये सांडपाणी, मलजल, कचरा इत्यादी बाबी येत असल्याने मिठी नदीतील पाणी अस्वच्छ होते. त्यामुळे मिठी नदी स्वच्छ करण्याचा प्रकल्प हाती घेताना तो दोन प्रकारात व चार टप्प्यांमध्ये हाती घेण्यात येणार आहे. यानुसार दोन प्रकारांपैकी एका प्रकरांतर्गत नदीतील पाण्यावर प्रक्रिया करुन ते स्वच्छ पाणी पुन्हा नदीच्या प्रवाहात सोडले जाणार आहे. तर दुस-या प्रकारांतर्गत नदीच्या जवळपासच्या परिसरातील भागात मलजल व सांडपाणी वाहून नेणा-या वाहिन्यांचे बांधकाम महापालिकेच्या संबंधित खात्यांद्वारे केले जाणार आहे. जेणेकरुन परिसरातील मलजल वा सांडपाणी नदीच्या पात्रात येण्यास प्रतिबंध होऊ शकेल. वरीलनुसार मिठी नदीचे पाणी स्वच्छ करण्याच्या पहिल्या टप्प्यात नदीच्या उगमापासून म्हणजेच 'फिल्टरपाडा' परिसर ते 'डब्ल्यूएसपी कम्पाऊंड' पर्यंतच्या १ हजार ६५० मीटर लांबीच्या नदीतील पाणी स्वच्छ करण्यासाठी जल प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी आवश्यक असणारे प्रक्रिया केंद्र (STP) हे 'डब्ल्यूएसपी कम्पाऊंड' जवळ उभारण्यात येणार आहे. यासाठी रुपये १२० कोटींचा खर्च अंदाजीत आहे. मे २०१८ पासून हे केंद्र उभारण्याचे काम सुरु होणे अपेक्षित असून केंद्र कार्यान्वित होण्यासाठी २४ महिन्यांचा कालावधी लागेल. या प्रक्रिया केंद्राद्वारे मिठी नदीतील ८० लाख लीटर पाण्यावर दररोज प्रक्रिया करुन स्वच्छ झालेले पाणी पुन्हा नदीत सोडण्यात येणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया यापूर्वीच सुरु झाली असून निविदा प्रक्रियेत भाग घेण्याची अंतिम तारीख १६ मार्च २०१८ अशी आहे, अशीही माहिती ठाकूर यांनी दिली आहे. त्याचबरोबर वर नमूद केल्यानुसार पहिल्या टप्प्यातील १ हजार ६५० मीटर लांबीच्या मिठी नदीमध्ये मलजल किंवा सांडपाणी जाण्यास प्रतिबंध व्हावा, यादृष्टीने फिल्टरपाडा ते 'डब्ल्यूएसपी कम्पाऊंड' या परिसरात मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे अधिक सक्षम करण्याचे देखील प्रस्तावित करण्यात आले आहे. मिठी नदी स्वच्छ करण्याचा उर्वरित तीन टप्प्यांबाबत देखील प्रशासकीय कार्यवाही सुरु करण्यास तत्वतः मंजूरी प्राप्त झाली आहे. यानुसार पहिल्या टप्प्यातील १ हजार ६५० मीटरचे काम पूर्ण झाल्यानंतर दुस-या टप्प्यात त्यापुढील ६ किलोमीटर लांबीच्या नदीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या अंतर्गत मलजल व सांडपाणी वाहून नेणा-या वाहिन्यांचे जाळे उभारण्यासोबतच २ उदंचन केंद्रे (Pumping Station) देखील उभारण्यात येणार आहे. यासाठी रुपये १६० कोटींचा खर्च अंदाजित आहे. तर तीस-या व चौथ्या टप्प्यात नदीच्या उर्वरित भागातील जवळपास परिसरातील मलजल वाहिन्या अधिक सक्षम करणे, मलजल वाहून नेण्यासाठी ५.२ किमी लांबीचा बोगदा बांधणे इत्यादी कार्ये अपेक्षित आहेत. तथापि, याबाबत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशनुसार गठित करण्यात आलेल्या संबंधित समितीची व 'मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरण' यांची यथायोग्य मंजूरी मिळाल्यानंतर दुस-या, तिस-या व चौथ्या टप्यातील कामे हाती घेता येणार आहेत.