मुंबई । प्रतिनिधी - पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते विरार पट्यांमध्ये प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या प्रवाशांच्या सोयीसाठी अंधेरी ते विरारदरम्यान धिम्या मार्गावर १५ डबा लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यासाठी प्लॅटफार्मची लांबीदेखील वाढवण्यात येणार असून, या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कंत्राट दिल्यानंतर दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रवाशांची वाढत जाणारी संख्या आणि लोकल गाड्यांवर पडणारा ताण पाहता १५ डबा लोकलही चालवल्या जात आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत अंधेरी ते बोरिवली या पट्ट्यात प्रवाशांची संख्या बरीच वाढली आहे. त्यामुळे या भागातून गर्दीच्या वेळेत प्रवास करणे अशक्य झाले आहे. दहिसर, मीरा रोड, भाईंदर, नायगाव, वसई रोड आणि नालासोपारा स्थानकांतून लोकलमध्ये प्रवेश करताना प्रवाशांना बरीच कसरत करावी लागते. एकंदरीतच हा प्रवास सुकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेने १५ डबा लोकलचे एक वेगळेच नियोजन केले आहे. अंधेरी ते विरारपर्यंत धिम्या मार्गावर १५ डबा लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जास्तीत जास्त प्रवासी यामधून प्रवास करू शकतील या दृष्टीने या दोन स्थानकांदरम्यान १५ डबा लोकलच्या फेऱ्याही अधिक चालवल्या जाणार आहेत. अंधेरी ते विरारपर्यंत १५ डबा लोकल चालवण्यासाठी फलाटांची लांबी वाढवणे गरजेचे आहे. या कामासाठी निविदा काढण्यात येत असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लोकल गाड्यांवरील बराचसा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.