नालेसफाईचा गाळ डम्पिंगमध्ये - चौकशीची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नालेसफाईचा गाळ डम्पिंगमध्ये - चौकशीची मागणी

Share This

मुंबई । जेपीएन न्यूज - 
मुंबई महानगरपालिकेकडून नालेसफाईची कामे सुरु आहेत. नालेसफाईचा गाळ मुंबई बाहेर टाकावा असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानंतरही कंत्राटदारांकडून गाळ कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जात असल्याचा प्रकार उघडीस आला होता. याबाबत विविध मीडियांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. याची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली. 

नद्यांच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. या प्रस्तावावर बोलताना नद्या आणि नाल्यांमधून गाळ काढण्याचे प्रस्ताव मंजूर केले जातात. नालेसफाई झाल्याचे आकडेवारी सादर केली जात आहे. मात्र हा गाळ कुठे टाकला जातो याची माहिती का सादर केली जात नाही असा प्रश्न रवी राजा यांनी उपस्थित केला. नाल्यांचा गाळ मुंबई बाहेर जात नसून हा गाळ मुंबईमधील कांजूरमार्ग आणि मुलुंड डम्पिंगवर टाकला जात आहे. याबाबतची बातमी वृत्तपत्रांमधून आली आहे. त्याची चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करावी अशी मागणी रवी राजा यांनी केली. 

रवी राजा यांनी केलेल्या मागणीला सत्ताधारी शिवसेनेने विरोध करत कंत्राटदारांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मुंबई बाहेर गाळ टाकत असल्याचे प्रशस्तीपत्र शिवसेनेच्या नगरसेवकांनी कंत्राटदारांना दिले. यामुळे संतप्त झालेल्या समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी देवनार डम्पिंगवरही मोठ्या प्रमाणात गाळ टाकला जात आहे. हा प्रकार शिवसेनेच्या नगरसेवकांनी येऊन बघावा. कंत्राटदारांना तुम्ही पाठीशी घालत असाल तर मुंबई तुंबणार नाही याची जबाबदारी शिवसेनेने घ्यावी असे आवाहन शेख यांनी केले. 

राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी नाल्यांची सफाई झाली नसल्याची छायाचित्र दाखवत यांत्रिकी पद्धतीने नाले सफाई करावयाची असताना नाल्यांच्या सफाईसाठी कामगारांना का वापरले जाते, शेवटच्या चार पाच दिवसात नाले साफ कसे होणार असे प्रश्न उपस्थित केले. प्रशासनाने दाखवलेले नाले बघून नाले सफाई चांगली होत असल्याचे सत्ताधारी बोलत असल्याची टिका जाधव यांनी केली. तर आसिफ झकेरिया यांनी वांद्रे येथील नालेसफाईसाठी लहान मुलांचा वापर सुरु असल्याने संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी केली.

हेही वाचा -
नालेसफाईचा गाळ मुंबईच्या डम्पिंगमध्ये -
http://www.jpnnews.in/2018/05/Nalesafai-scam.html

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages