दोस्ती बिल्डर विरोधात महापालिका इमारत विभाग कार्यालयावर मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 June 2018

दोस्ती बिल्डर विरोधात महापालिका इमारत विभाग कार्यालयावर मोर्चा


मुंबई - मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली वडाळा येथील जमीन खचून झालेल्या दुर्घटनेच्या निषेधार्थ लॉइड इस्टेट सोसायटी आणि शेजारील सोसायटीतील नागरिकांचा दोस्ती बिल्डर विरोधात वडाळा महापालिका इमारत विभाग कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी बिल्डरविरोधात कारवाईची मागणी केली. यावर महापालिका इमारत विभाग प्रमुखांनी दोस्ती बिल्डरला काम बंद करण्याचे आदेश दिले.

लॉइड इस्टेट इमारती शेजारील दोस्ती ग्रुपतर्फे सुरू असलेल्या ट्वीन टॉवर्सच्या बांधकामामुळे आज येथील जमीन खचलेली आहे. या मध्ये बऱ्याच गाड्या जमिनीबरोबर खाली खचल्या गेल्या. अजूनही जमीन खचण्याचा धोका आहे. पण आज तीन दिवस उलटूनही पालिकेकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आज येथील रहिवाशांनी येथील महापालिका विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. आम्ही आज महापालिका इमारत विभाग कार्यालय श्री पोद्दार यांच्याशी चर्चाही केली. सुरवातीला ही दुर्घटना पावसामुळे घडण्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पण त्यांचा हा दावा आम्ही साफ खोडून काढला. 26 जुलै 2005 ला एवढा पाऊस पडूनही या इमारतीला कसलेही नुकसान झाले नाही, मग आता कसे होणार? आम्ही सर्वांनी त्यांच्याकडे मागणी केली की, जोपर्यंत या परिसरात असलेल्या इमारतींचे संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट होत नाही, तोपर्यंत दोस्ती बिल्डर्सचे सुरू असलेले ट्वीन टॉवर्सचे काम बंद करण्याचे आदेश द्यावेत, नाहीतर आम्ही सर्वजण येथे उपोषणाला बसू. दोन तासांच्या चर्चेनंतर महापालिका इमारत विभाग कार्यालय प्रमुखांनी दोस्ती ग्रुपचे सुरू असलेले काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली. सदर मोर्चा मध्ये संजय निरुपम यांच्या सोबत मनपाचे विरोधी पक्ष नेते रवी राजा, माजी खासदार एकनाथ गायकवाड, भालचंद्र मुणगेकर, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा अजंता यादव, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील आणि लॉइड इस्टेट आणि शेजारील इमारतींमधील रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चात सहभागी रहिवाशांच्या प्रतिक्रिया - 
खोदकाम सुरु आहे तेथून ब्लॉसम इमारत जवळ आहे. इमारतीच्या पोडियमला धोका आहे. संरक्षक भिंत बांधली नाही म्हणून माती घसरली. बेकायदेशीर काम थांबवावे. जीवाशी खेळ करून बंगले बांधणे थांबवावे अशी मागणी विनय वत्स यांनी केली. तक्रार करूनही प्रकरण दडपले जात आहे. आज लॉयड इमारत खाली करायला सांगितली आहे. जमीन खचली तेथून लॉयड इमारती पेक्षा ब्लॉसम इमारत जवळ आहे. आम्हाला जास्त भीती असल्याने उद्या ब्लॉसम व कार्नेशन इमारतही खाली करा असे सांगितले जाऊ शकते, यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 
- संगीता काशीद

रस्ता खचलेल्या लॉयड इस्टेट इमारती जवळ दोस्ती बिल्डरचे काम सुरु आहे. या ठिकाणी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी बिल्डरने ४० फुटाहून खोल खड्डा खणला आहे. हा खड्डा खणताना गेले दिड ते दोन वर्षे आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तक्रार करूनही बिल्डरवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आम्ही पहाटे झोपेतून उठलो तेव्हा इमारती खालील जमीन खचल्याचे पाहिले. ही दुर्घटना पहाटे झाली म्हणून जिवीतहानी झालेली नाही. संध्याकाळी दुर्घटना झाली असती तर रहिवाशी, लहान मुले या दुर्घटनेत जखमी किंवा मृत्युमुखी पडली असती. बिल्डरच्या खोदकामामुळे जमीन भुसभुशीत झाली आहे. इमारतीचे पिलर वाकडे झाले आहेत, मीटर रम खराब झाली आहे, मंगळवारी सायंकाळी पुन्हा जमीन धसली आहे. हि नैसर्गिक आपत्ती नसून मानव निर्मित आपत्ती आहे. यामुळे बिल्डरवर कारवाई करण्यासाठी आम्ही तक्रार दिली मात्र आमची वेगळी तक्रार घेतलेली नाही. इमारती पडण्याची भीती आहे. सुरक्षा भिंत बांधावी, स्टिलचे रॉड लावावेतकिंवा इतर काही उपाययोजना करायच्या त्या कराव्यात मात्र आमची घरे वाचवावीत.
- सोनिया निर्लेकर

आम्हाला घरे खाली करा असे सांगण्यात आले. आम्ही काय करणार ? आमची चुकी नाही बिल्डरची चुकी आहे. गेले दिड वर्षे आम्ही भांडत आहोत. कोणीही लक्ष देत नाही
- स्वाती पंडित

मोर्चाच्या अधिक फोटोसाठी खालील लिंकला भेट द्या -  

Post Bottom Ad