मुंबई - भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांच्यामध्ये तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा झाली आहे. अमित शहा उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पावणेआठच्या सुमारास मातोश्रीवर पोहोचले होते. त्यांच्यात साडेआठपर्यंत चर्चा होणार होती. मात्र ही चर्चा लांबल्याने या बैठकीत नेमकं काय झालं, कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं.
देशभरात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला पत्करावे लागलेले पराभव, विरोधकांची होत असलेली एकजूट आणि शिवसेनेनं दिलेला एकला चलो रेचा नारा, या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात होती. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती होणार का?, दोन पक्षांमध्ये निर्माण झालेली दरी मिटवण्यात अमित शहांना यश येणार का?, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी अमित शहा मातोश्रीवर पोहचल्यावर दुसऱ्या मजल्यावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात मॅरेथॉन चर्चा झाली. या चर्चेनंतर उद्धव ठाकरे अमित शहांना सोडण्यासाठी मातोश्रीच्या दरवाज्यापर्यंत आले होते. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी अमित शहा यांना नमस्कारदेखील केला. अमित शहांची देहबोलीदेखील अतिशय सकारात्मक वाटत होती. त्यामुळे या दोन नेत्यांमधील चर्चा सकारात्मक झाली, अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. या बैठकीनंतर अमित शहा मातोश्रीवरुन सह्याद्री अतिथीगृहावर जाण्यासाठी रवाना झाले.