Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक वास्तू युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत

नवी दिल्ली - दक्षिण मुंबई मधील १९ व्या व २० व्या शतकातील व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तुंचा व कलात्मक वास्तुंचा (आर्ट डेको) समावेश आज जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. बहारिनमधील मनामा येथे युनेस्कोच्या जागतिक वारसा परिषदेची 42 वी परिषद सुरु आहे. आज या परिषदेत दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक व कला वास्तुंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आल्याची घोषणा समितीच्या अध्यक्ष शैखा हाया रशेद अल खलीफा यांनी केली. 

जगातील ६ ठिकाणे ठरली वारसा स्थळे -
महाराष्ट्रातील या वास्तुंसह सौदी अरब मधील अल-अहसा या हिरवळीच्या प्रदेशाचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश करण्यात आला. या भूप्रेदशातील ऐतिहासिक इमारती, बगीचे, बंधारे, विहीरी खास वैशिष्ट्ये आहे. ओमान येथील क्वॉलत या प्राचिन शहराचा समावेशही या यादीत आहे, 11व्या आणि 15व्या शतकात हे शहर महत्वाचे बंदर म्हणून विकसित करण्यात आले होते, वास्तू कलेचा उत्तम नमुना असलेल्या अनेक वास्तू या ठिकाणी बघायला मिळतात. जपानच्या नागासाकी भागातील हिडन ख्रिश्चन साईट, कोरिया गणराज्यातील सानसा येथील बुद्ध पर्वत, इराणमधील फार्स पर्वत रांगांमधील सासीयन पुरतत्व भूप्रदेश आणि केनिया येथील मिगोरी शहरातील इशान्य भागात स्थित 16 व्या शतकातील थिमलिच ओहींगा या दगडाद्वारे निर्मित इमारतीचा समावेश जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सर्वात जास्त वारसा स्थळे; भारताचा जगात 7 वा क्रमांक -
युनोस्कोच्या घोषणेमुळे आता राज्यात पाचव्या जागतिक वारसा स्थळाचा समावेश होणार असून देशातील सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे. यापूर्वी राज्यातील अजिंठा लेणी, एलिफंटा लेणी, वेरुळ लेणी व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे. राज्यातील या परिसराचा जागतिक वारसा यादीत समावेशामुळे देशातील वारसा स्थळांच्या यादीत 37 व्या स्थळाचा समावेश होणार असून सर्वात जास्त वारसा स्थळे असलेल्या देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत 7 व्या क्रमांकावर येणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुढाकार -
केवळ मुंबई नव्हे तर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असा निर्णय आज युनेस्कोने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तुंचा व कलात्मक वास्तुंना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि दक्षिण मुंबई भागातील जतन कार्य करणाऱ्या सामाजिक संघटना यांना प्रोत्साहन दिले होते. श्री.फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या पथकाने युनेस्को परिषदेत आपली भूमिका मांडली..

या ऐतिहासिक वास्तुंविषयी -
दक्षिण मुंबईतील मरिन ड्राईव्ह व फोर्ट परिसरात असलेल्या 19 व्या शतकातील व्हिक्टोरियन वास्तू शैलींच्या इमारती व 20 व्या शतकातील आर्ट डेको शैलीच्या इमारती आहेत. यामध्ये इमारतींमध्ये मुख्यत्वे उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, जुने सचिवालय, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, एल्फिस्टन महाविद्यालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, पश्चिम रेल्वे मुख्यालय, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, ओव्हल मैदान या व्हिक्टोरियन वास्तुशैलीच्या इमारती आहेत. तसेच, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, बॅकबे रेक्लमेन्शनची पहिली रांग, दिनशॉ वाच्छा रोडवरील राम महल, इरॉस व रिगल सिनेमा हॉल तसेच मरिन ड्राईव्ह येथील पहिल्या रांगेतील इमारती आदी वास्तुंचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत होण्यासाठी नामांकन झाले आहे. युनेस्कोची तांत्रिक सल्लागार समिती असलेल्या इंटरनॅशनल कौन्सिल फॉर मोमेंटस अँड साईटस् या समितीने नामांकनाचे पत्र राज्य शासनाला पाठविले होते. त्यामध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी मुंबई परिसराच्या समावेशास हिरवा कंदिल दाखविला होता.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom