Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

‘मिशन मुस्कान’मुळे एकही मूल उपचाराविना राहणार नाही - मुख्यमंत्री


मुंबई - ‘मिशन मुस्कान’मुळे राज्यातील गरीबातील गरीब कुटुंबातील एकही मूल उपचाराविना राहणार नाही,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. हे मिशन मुस्कान राज्याच्या कानाकोपऱ्यात सर्वदूर पोहचविण्याचे प्रयत्न व्हावेत असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात बालकांवरील शस्त्रक्रियांसाठी ‘मिशन मुस्कान’ राबविण्यात येणार आहे. या मिशनच्या प्रारंभासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि रोटरी क्लब इंटरनॅशनल यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे, रोटरी क्लबचे स्वरेश चोखानी, अशोक महाजन, प्रकाश समुद्र, अनिल कन्हैया, विनोद भिमराजका यांच्यासह वोक्हार्ट रुग्णालय, एस.आर.सी.सी. बाल रुग्णालय, वाडिया बाल रुग्णालय, फोर्टीस रुग्णालय, सर एच.एन. रिलायन्स रुग्णालय आदी रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मिशन मुस्कान अत्यंत महत्वाकांक्षी आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून अनेकविध बाबींसाठी मदत केली जाते. पण आता मुलांच्या दुर्धर आजारावरील उपचारांसाठी विशेष लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. रोटरी क्लबने समाजसेवी उपक्रमात नेहमीच आपला सहभाग ठेवला आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक सेवा उपक्रम राबविले जात आहेत. समाज, स्वयंसेवी संस्था-सामाजिक संस्था तसेच शासन यांच्या एकत्रित प्रयत्नातून एखादा उपक्रम राबविला जातो. तेव्हा परिवर्तनाची गती चौपट होते असा अनुभव आहे. त्यामुळे 'मिशन मुस्कान'च्या माध्यमातूनही राज्यातील गरीबातील-गरीब कुटुंबातील मूल उपचाराविना राहणार नाही अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दुर्धर आजारातून उपचारामुळे बरे होणाऱ्या मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील हास्य, मोठ्या संपत्तीहून महत्त्वाची असल्याचा अनुभव आला आहे. त्यादृष्टीने 'मिशन मुस्कान'ही अनेक मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात उपचाराद्वारे हास्य फुलवेल असा विश्वास वाटतो. त्यामुळे हे मिशन राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे विशेष कार्य अधिकारी शेटे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून आतापर्यंत पंधरा लाख गरजूंना मदत केल्याचे, त्यापोटी सुमारे एक हजार कोटींच्या निधींचे वाटप केल्याची माहिती दिली. गेल्या तीन ते चार वर्षांच्या कालावधीत सुमारे साडेतीनशे कोटींचा मदत निधी गरजूंच्या उपचारासाठी देण्यात आल्याचेही सांगितले. यावेळी रोटरी क्लबचे चोखानी तसेच महाजन यांनी बालरुग्णांवरील दुर्धर अशा शस्त्रक्रियांसाठी क्लब राज्यभरातील शाखांशी समन्वय साधून जास्तीत जास्त मुलांपर्यंत उपचार पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहील असे सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom