मुंबई - पालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद असतानाही रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत, रुग्णालयासाठी खाजगी संस्थांना जागा देऊनही त्यांच्याकडून रुग्णांना वैद्यकीय सेवा नाकारल्या जातात असा आरोप करून अटी शर्थीचे उल्लंघन करणाऱ्या या संस्थांकडून पालिकेने या जागा ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी गुरुवारी नगरसेवकांनी पालिका सभागृहात करून प्रशासनाला धारेवर धरले.
काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी यावर ६६ -ब अन्वये आज सभागृहात चर्चा घडवून आणली .पालिकेच्या बाह्यरुग्ण विभागात वर्षभरात १लाख ३० हजार रुग्णांवर उपचार केले जातात. केईएम रुग्णालयात अंदाजे ५२,०००, सायन रुग्णालयात ४०,००० तर नायर रुग्णालयात अंदाजे ३०,००० याप्रमाणे छोटया मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. मुंबईबाहेरून येणाऱ्या रुग्णांचा ओघ लक्षात घेता सर्वसामान्य रुग्णांना पालिकेतर्फे पुरविण्यात येणारी रुग्णालयीन सेवा अपुरी पडत आहे.मुंबईतील गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळावेत यासाठी सुसज्ज रुग्णालय बांधण्यासाठी पालिकेने काही खाजगी संस्थाना जागा दिल्या. मात्र या खाजगी संस्था अटी शर्थीचे उल्लंघन करून गरीब रुग्णांना योग्यप्रकारे वैद्यकीय सेवा देत नाही.त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. अंधेरीच्या सेव्हन हिल्स ,ब्रम्हकुमारी हॉस्पिटलसाठी पालिकेने जागा देताना २५ टक्के रुग्णांसाठी राखीव जागा ठेवण्याचे स्पष्ट केले होते. मात्र सदर रुग्णालयांकडून रुग्णांना सोयीसुविधा नाकारण्यात येत आहेत, असा आरोप करत जर सदर रुग्णालयांकडून रुग्णांना सुविधा पुरविण्यात येत नसतील तर त्यांना दिलेली जागा पालिकेने ताब्यात घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. याला विरोधी पक्षनेते रवि राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांच्यासह सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दर्शवला. सेव्हन हिल रुग्णालयावर प्रशासनाचा अंकुश नाही .या रुग्णालयाने पालिकेचे मालमत्ता करापोटी ४७ लाख कोटी थकवले असल्याचेही अश्रफ आझमी व रविराजा यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. तसेच अटी शर्तींचा भंग करून रुग्णांना वैद्यकीय सेवा नाकारणाऱ्या रुग्णालयांना दिलेल्या जागा परत घ्याव्यात अशी मागणीही सदस्यांनी लावून धरली. ज्या खाजगी संस्थांना रुग्णालयांठी पालिकेने जागा दिल्या आहेत .त्यांची मुजोरी रोखण्यासाठी तसेच त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी पालिकेने दक्षता समिती स्थापन करून त्यावर नगरसेवकांची नियुक्ती करावी, शिवडी रुग्णालयावरील रुग्णांचा वाढत भार लक्षात घेऊन पूर्व व पश्चिम रुग्णालयात टीबी रुग्णालय उभारावे, मुंबईत पालिकेने बर्न रुग्णालय उभारावे तसेच कॅन्सरच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिकेने कॅन्सर रुग्णालय उभारावे. अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी केली .