नव्या बांधकामांमुळे पाणी तुंबण्याचे नवीन स्पॉट - आयुक्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 July 2018

नव्या बांधकामांमुळे पाणी तुंबण्याचे नवीन स्पॉट - आयुक्त


मुंबई - मुंबईत नवीन बांधकामे तयार होत असल्यामुळे पाणी तुंबणारे नवीन स्पॉटस् तयार झाले आहेत. शहरात कोणतेही नियोजन न करता काँक्रिटीकरण सुरु असून ते रोखण्यासाठी 'डीसीआर'मध्ये तरतूद करणार असल्याचे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समितीत सांगितले. उद्याने, क्रीडांगण आणि मनोरंजन मैदानांमधील काँक्रिटीकरणाची कामे बंद करणार असल्याचे आयुक्त यावेळी म्हणाले.

मुंबईत सतत चार दिवस पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. याचे पडसाद महापालिकेच्या स्थायी समितीत उमटले. स्थायी समितीची बैठक सुरु होताच विरोधी पक्षनेते रवी राजा, काँग्रेसचे नगरसेवक असिफ झकेरिया, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव आणि समाजवादी पक्षाच्या गटनेत्यांनी मुंबईत पाणी तुंबल्यामुळे नागरिक नगरसेवकांनाच दोषी धरुन त्यांच्यावर टीका करत आहेत. असे असताना याप्रकरणी प्रशासनाने स्वत:हून का निवेदन का करत नाही असा जाब विचारात पालिका आयुक्तांना बोलवावे अशी मागणी केली.

नगरसेवकांनी केलेल्या मागणीनुसार पालिका आयुक्तांनी साचलेल्या पाण्याबाबत स्थायी समितीत निवेदन केले. मुंबईला रोज ३७५० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होत असून, त्यापैकी १७०० दशलक्ष लिटर्स पाण्यावर प्रक्रिया न करुन समुद्रात सोडले जाते. त्यासाठी ६ नवीन प्रक्रिया केंद्रे १ ऑक्टोबरपासून सुरु करणार आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा वेगाने करावा म्हणून वरळी येथे ‘स्पेशल कंट्रोल रूम’ सुरु केला जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली.

समुद्राला येणारी मोठी भरती आणि शहरात ठिकठिकाणी पडणाऱ्या पावसामुळे तुंंबणारे पाणी उपसण्यासाठी लावण्यात येणारे पंप हे भरतीवर अवलंबून असतात. शहरात साचणारे पाणी समुद्रात टाकण्यासाठी कमी उंचीच्या लाटा असल्यास बाहेर सोडता येते, ते नैसर्गिक वेगाने बाहेर पडते पण लाटा उंच असल्यास पाणी बाहेर टाकणाऱ्या पंपांची द्वारे (गेट) बंद करुन ठेवावी लागतात. त्यावेळी पंपांची क्षमता कमी असते. सतत पाऊस पडताना आणि लाटा उंच असताना 'गेट' उघडली असती तर समुद्राचे पाणी शहरात घुसले असते. यामुळे गेट बंद ठेवण्यात आली होती. पंपिंग करताना ते शास्त्रशुद्ध करावे लागते, असे आयुक्तांनी सांगितले. यावर फक्त ब्रिमस्टोवॅड हाच उपाय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

रस्त्यांवर साचणाऱ्या पाण्याचा उपसा करण्यासाठी यावेळी ३०० पंप संपूर्ण मुंबईत लावण्यात आले असून. त्यापैकी १०५ पंप पूर्ण क्षमतेने सुरु होते, असा दावा आयुक्तांनी केला. भायखळा येथे साचणाऱ्या पाण्यासाठी वाहिनीचे बांधकाम सुरु आहे. १० ते १५ टक्के काम सुरु आहे पण त्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळालेली नसून, हिंदमाता येथील काम सुरु असताना जलवाहिनी फुटल्याने तेथे पाणी तुंबले, असे आयुक्तांनी मान्य केले. अभियांत्रिकी अभ्यासामुळे यावेळी फितवाला लेनमध्ये पाणी साचले नाही, असे ते म्हणाले.

ट्राफिकमुळे काही ठिकाणचे काम करण्यास विलंब झाला. हिंदमातासारख्या ठिकाणी केबल, लाइटची वायिंरग असल्यामुळे काम करताना मर्यादा येतात. येथे अनेक जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असल्यामुळे झाडांची मुळे जाऊन ब्लॉक झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरण होत असल्यामुळे पाणी जिरण्यास जागाच शिल्लक नाही, त्यामुळे पाणी साचत असल्याचे आयुक्तांनी स्थायी समितीत सांगितले.

Post Bottom Ad