मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुका येथे सुपर मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी शिफारस रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री व राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी करताच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात दादा पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्यात यावा, असे आदेश रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
मुंबई गोवा महामार्गालगतच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोर-गरीब रुग्णांना औषध उपचार मिळण्यासाठी जवळच्या ठिकाणी कुठेही अद्ययावत सोयीयुक्त असे रुग्णालय उपलब्ध नाही. दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत तसेच विविध सणांनिमित्त मुंबईतून कोकणात जाणर्यांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. देश विदेशातील पर्यटकही येथील विविध पर्यटनस्थळांना भेटी देतात. अशातच मुंबई गोवा महामार्गावरील अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. परंतु राजापुरमध्ये अद्ययावत असे रुग्णालय नसल्याने अपघातग्रस्तांना वेळेवर योग्य उपचार मिळत नाही, त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो. या मार्गावरील बहुतांशी अपघातग्रस्तांना कोल्हापुर व मुंबई येथील रुग्णालयात दाखल करावे लागते.
राजापुर तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेची ही अडचण लक्षात घेऊन राजापुर-लांजा-साखरपा मतदार संघाचे आमदार राजन साळवी यांनी राजापुर येथे सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय बांधण्याची मागणी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री वायकर यांच्याकडे केली होती. राजापुर तालुक्यातील ओणी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा मोकळा असलेला भुखंडावर हे रुग्णालय बांधण्यात यावे, अशी सुचनाही त्यांनी केली आहे.
त्यामुळे आमदार राजन साळवी यांच्या या रास्त मागणीला गतीने चालना देण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर होणार्या न अपघातग्रस्त रुग्णांना व रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील गोर-गरीब रुग्णांना तात्काळ औषधोपचार मिळावे यासाठी राजापुर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा देण्यात यावी, यासाठी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री वायकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील याची अधिवेशनाच्या दरम्यान भेट घेऊन यासंदर्भात एक लेखी पत्र देऊन शिफारस केली आहे. याची दखल घेऊन चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे आदेश रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.