नागपूर11/7/2018 - छत्रपती संभाजी महाराज आणि शहीद सैनिकांच्या विजयस्तंभाचे शासनातर्फे स्मारक उभारणार असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
भिमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीनंतर छत्रपती संभाजी महाराज आणि शहीद सैनिकांच्या विजयस्तंभाचे स्मारक उभारणार काय, असा प्रश्न सदस्य ॲड.जयदेव गायकवाड, शरद रणपिसे यांनी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, या स्मारकासाठी पुणे जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यासाठीचे निर्देश दिले आहेत. या स्मारकासाठी निधीची कमतरता भासणार नाही.
भिमा-कोरेगाव दंगल प्रश्नी सदस्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, या दंगलीत घराचे नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत देण्यात आली असून आयोगाचा अहवाल आल्यानंतर नुकसानीची प्रकरणे तपासून अशा कुटुंबांनाही आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच दंगलीत सहभागी झालेल्या नऊ आरोपींपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
पुजा सकट हिच्या मृत्यू प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही. भिमा-कोरगाव दंगल प्रकरणी चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाला तारीख वाढवून दिली जाईल, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
संभाजी भिडे यांना दंगल आणि चुकीच्या केलेल्या वक्तव्या प्रकरणी सरकार अटक का करत नाही, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकरणी पोलीस चौकशी करीत असून जो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. एल्गार परिषदेशी संबधित असलेल्या कार्यकर्त्यांची नक्षलवाद्यांशी संबध असल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनाला आले आहे. त्यांची चौकशी सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप, ॲड.जनार्दन चांदूरकर,प्रकाश गजभिये, कपिल पाटील, जोगेंद्र कवाडे, सुनिल तटकरे आणि डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सहभाग घेतला.