मुंबई - मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे भांडुप येथे जपानी पद्धतीचे उद्यान उभारण्यात येणार आहे. यासाठी पालिकेकडून ५ कोटी २४ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. जपानी पद्धतीने उभारण्यात येणारे मुंबईतील हे पहिले उद्यान ठरणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
पालिकेच्या एस विभागातील भांडुप येथील सीटीएस क्रमांक १९८ या भूखंडावर जपानी पद्धतीच्या उद्यानाचा विकास करण्यात येणार आहे. या प्रस्तावित कामात स्थापत्य कामे जसे की संरक्षण भिंत बांधणे, अंतर्गत पदपथ, गझेबो बांधणी, भूमिगत पाण्याची टाकी, सुरक्षारक्षक चौकी, प्रवेशद्वाराची कामे, उद्यानासाठी मातीची भरणी करणे, वरिष्ठ नागरिकांसाठी बसण्याची जागा, विद्युत खांब, दिवे, बेंचेस मुलांकरता खेळणी, सीसीटीव्ही कॅमेरा, पदपथाच्या बाजूला फुलझाडे लावणे, हिरवळीचे उंचवटे इ. कामांचा समावेश आहे. या कामाचे मे. के. के. थोरात या कंत्राटदाराला ५ कोटी २४ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. या कामाचा कालावधी पावसाळ्यासह ११ महिने असून याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.