सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - एकनाथ गायकवाड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 April 2019

सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - एकनाथ गायकवाड


मुंबई - मोदींनी केलेल्या नोटबंदीमुळे शेकडो लोकांचे नाहक जीव गेले असून, त्याबद्दल या अविचारी सरकारवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, अशी भुमिका दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी मांडली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या वार्तालापात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारचे फसलेले आर्थिक धोरण, पुनर्विकास या मुद्द्यांवर विस्ताराने भुमिका मांडली.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना गायकवाड यांनी प्रामुख्याने मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, अर्थव्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी अधिकाधिक छोटे उद्योगउभे राहणे गरजेचे आहे. मात्र मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आणि नोटबंदीसारख्या निर्णयामुळे छोट्या उद्योगांवरच कुऱ्हाड कोसळली. अनेकांचे रोजगार गेले. ही परिस्थिती सावरण्यासाठी लघुउद्योजकांना पुन्हा उभे करण्याची गरज आहे. याशिवाय जीएसटीची पुनर्आखणी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. धारावी पुनर्विकासाच्या अनुषंगानेत्यांनी झोपडपट्टी पुनर्वसनावरही भाष्य केले. मुंबईतील बीडीडी चाळीचे आयुष्य आता संपले असून बीडीडी पुनर्विकासाचा मुद्दा युद्धपातळीवर मार्गी लागणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसेच धारावीचा पुनर्विकास एसआरएअंतर्गत न करता धारावीच्या पुनर्विकासासाठी न्यु सिटी डेव्हलपमेंट प्लान राबवण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच प्रत्येकाला किमान पाचशे चौरस फुटांचेघर मिळायला हवे या आश्वासनाचाही त्यांनी पुनरूच्चार केला. धारावी म्हणजे मिनी इंडिया असून धारावीतील लोक मातीतून सोने कमावणारे लोक असल्याचेही ते म्हणाले.

मनसे आणि राज ठाकरे यांच्या प्रचाराबाबत विचारले असता गायकवाड म्हणाले की, मनसे आणि राज ठाकरे हे त्यांची स्वत:ची भुमिका मांडतात. त्यांच्या सभा आणि भाषणे पाहिली तर हा सुर्य आणिहा जयद्रथ अशी त्यांची मांडणी आहे. त्यांच्या भाषणांमुळे जनमानसावर नक्कीच फरक पडत असल्याची बाब कबुल करतानाच त्यांनी राज ठाकरेंच्या भुमिकेबद्दल त्यांचे आभारही व्यक्त केले. तसेच शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार राहुल शेवाळे गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात फिरकले नसल्याचा दावाही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान केला.

Post Bottom Ad