महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी व या संदर्भातील कायद्याची माहिती व्हावी, यासाठी आज एकाच दिवशी राज्यभर ‘सायबर सेफ वुमन’ मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व महाराष्ट्र सायबर यांच्या सहकार्याने ही मोहीम पार पडली. या मोहिमेत 12 जिल्ह्यात विद्यार्थिनींची जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.
सायबर गुन्हे, इंटरनेटच्या माध्यमातून होणारी फसवणूक, लैंगिक अत्याचार, विवाहविषयक वेबसाईटवरून होणारी फसवणूक आदींबाबत महिला व तरुणींना माहिती व्हावी, यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात 150 ठिकाणी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. इंटरनेट वापरताना, फोटो अपलोड करताना तसेच समाजमाध्यमांचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, महिला सुरक्षाविषयक कायदे या विषयावर सायबर विषयातील तज्ज्ञ, सायबर पोलीस अधिकारी, महिला दक्षता समिती सदस्यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या तज्ज्ञांना उपस्थित शालेय विद्यार्थिनी व तरुणींनी विविध प्रश्न विचारून माहिती घेतली.