मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या परेल येथील केईएम रुग्णालयात एका मागासवर्गीय विद्यार्थ्यांला जातीवाचक शिवीगाळ करून त्याला मारहाण करण्याची वारंवार धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दोषी विद्यार्थी, वॉर्डन तसेच रुग्णालयाचे डीन यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी डीन, वॉर्डन आणि विद्यार्थ्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सोबोध मोरे यांनी दिला आहे.याआधी नायर रुग्णालयात डॉ. पायल तडवी हिच्यावर अन्याय अत्याचार केल्याने तीने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर केईएम रुग्णालयात असा प्रकार होण्याआधी रोखण्याची मागणी करण्यात आली आहे.
केईएम रुग्णालयातील जी एस मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्युपेशनल थेरेपी या वैद्यकीय शाखेत सुगत पडघन हा विद्यार्थी शिकत आहे. तो कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत आहे. २०१९ पासून त्याला उच्चवर्णीय विद्यार्थ्यांकडून मानसिक शारीरिक त्रास दिला जात आहे. त्याची रॅगिंग केली जात असून जातीवाचक शिवीगाळ केली जात आहे. यासंदर्भात सुगतने वेळोवेळी हॉस्टेल वार्डन, प्राध्यापक यांना याबाबत तक्रार दिली आहे. त्याने १० एप्रिल २०१९ मध्ये कॉलेजचे डीन, उपअधीक्षक, विभागप्रमुख, वॉर्डन, विद्यार्थी चिटणीस, आदींना तक्रार दिली. मात्र त्याची गंभीर दखल घेण्यात आली नाही. तत्कालीन वॉर्डन डॉ. सुनील कुयरे यांनी या विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकांना अशी तक्रार दिल्यास तुला कॉलेज आणि हॉस्टेलमधून काढून टाकू असे सांगितले. त्यानंतरही इतर विद्यार्थी इमारतीवरून फेकून देण्याची धमकी देत असल्याने या त्रासाला कंटाळून सुगत मराठवाड्यात आपल्या गावी गेल्याचे मोरे यांनी संगितले.
शैक्षणिक नुकसान होत असल्याने गावावरून पुन्हा मुंबईत आल्यावर सुगत याला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली जात असल्याने १३ डिसेंबरला पुन्हा डीनला लेखी तक्रार दिली. १५ व १६ डिसेंबरला रॅगिंग चौकशी समिती नेमून चौकशीचा देखावा करण्यात आला. या चौकशी समिती समोर धमक्या देणारे विद्यार्थी अमेघ पाटील आणि योगेश शिंगणे यांना बोलालेही नाही. रॅगिंग झाली हे पीडित विद्यार्थी सिद्ध करू शकला नाही असा निष्कर्ष काढण्यात आल्याचा अहवाल तयार करण्यात आला. दोषी विद्यार्थी तसेच वॉर्डन यांना पाठीशी घालण्यात आल्याची माहिती मोरे यांनी दिली.
यासंदर्भात कोणतीही कारवाई होत नसल्याने आम्ही सामाजिक कार्यकर्ते केईएमचे डीन यांची भेट घेण्यास गेलो असता ते निघून गेल्याने भेट झाली नाही. हा प्रकार पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. भारमल यांच्या कानावर घातल्यावर आम्हाला चौकशी समितीचा अहवाल देण्यात आला. हा अहवाल चुकीचा असल्याने आम्ही सुगत आणि त्याच्या वडिलांना घेऊन पोलीस ठाण्यात रॅगिंग तसेच ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा म्हणून तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी राज्याच्या एसटी एसी आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे. सुगतला न्याय देण्यात रुग्णालयाचे डीन, इतर डॉक्टर अधिकारी कमी पडले आहेत. यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोषींवर कारवाई करून सुगतला न्याय मिळाला नाही तर नायर रुग्णलयात डॉ. पायल तडवी सारखे प्रकरण घडू शकते. असे प्रकरण घडू नये म्हणून पालिका आयुक्तांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मोरे यांनी केली. तसेच कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा मोरे यांनी सामाजिक संघटनांच्या वतीने दिला आहे.
दरम्यान याबाबत चौकशी समिती नियुक्त केली होती. त्याचा अहवाल मागील आठवड्यात समितीने दिला. या चौकशीमध्ये तो विद्यार्थी आपल्यावर अत्याचार होत असल्याचे सिद्ध करू शकला नाही. चौकशी समितीचा अहवाल राज्याच्या मेडिकल परिषद आणि स्थानिक पोलीस ठाण्यात देण्यात आला आहे अशी माहिती केईएम रुग्णालयाचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.
No comments:
Post a Comment