मुंबई - नाताळचा सण, थर्टीफर्स्टचे होणारे कार्य़क्रम तसेच लग्न समारंभांना होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने नवे नियम जारी केले आहेत. सभागृह अथवा खुल्या जागेत २०० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहाणार असतील तर महापालिकेची विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. असे आदेश मंगळवारी पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी दिले.
जगभरात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. राज्यातही कोरोनाची तिसऱ्या लाटेची भीती असताना आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण सापडत असल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यात सध्या सार्वजिनक ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे नियम, धाब्यावर बसवले जात असल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे पालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. नाताळ, थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी मंगळवारी नवीन नियम जारी केले आहेत. यात सभागृह अथवा खुल्या जागेत २०० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहाणार असतील तर महापालिकेची विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारच्या नोव्हेंबर महिन्याच्या निर्णयानुसार १ हजार पेक्षा जास्त व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित राहाणार असतील तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार होती. तर, आता नव्या आदेशानुसार कार्यक्रमाला २०० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहाणार असल्यास स्थानिक प्रभाग कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच ही परवानगी दिल्यानंतर पालिकेचे पथक स्वता जाऊन तपासणी करेल, असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. बंदिस्त जागेत क्षमतेच्या ५० टक्के आणि खुल्या जागेत २५ टक्के व्यक्तींना कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याची परवानगी असणार आहे.
No comments:
Post a Comment