मुंबई - दीपावली सणाच्या निमित्ताने मुंबईतील महत्त्वाचे रस्ते, वाहतूक बेटं आदी सार्वजनिक ठिकाणे विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेत. दिनांक २२ ते २९ ऑक्टोबर या एका आठवड्याच्या कालावधीसाठी ही विद्युत रोषणाई असणार आहे. या रोषणाईसाठी मुंबई महापालिकेने तब्बल साडेतीन कोटी रूपयांचा खर्च केला आहे.
घरोघरी तिरंगा अभियानामध्ये मुंबई महानगरात केलेल्या विद्युत रोषणाईचे मुंबईकरांनी कौतुक केले होते. नागरिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्याचा हातभारही लागला. त्याच धर्तीवर दीपावली निमित्त मुंबई महानगरातील महत्त्वाची व अधिकाधिक नागरिकांच्या दृष्टीक्षेपात असणारी सार्वजनिक स्थळं, महत्त्वाचे रस्ते, वाहतूक बेटं आदी ठिकाणी विभाग कार्यालयांच्या माध्यमातून दिनांक २२ ते २९ ऑक्टोबर या एका आठवड्याच्या कालावधीसाठी आकर्षकरित्या विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागासाठी १५ लाख प्रमाणे तीन कोटी ६० लाख रुपयाचा निधी देण्यात आला आहे. या कामांसाठी प्रत्येक विभाग कार्यालयाला प्रासंगिक खर्च म्हणून निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार स्थळ दरपत्रिका मागवून तातडीने कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिली आहे.
मुंबई महानगरातल्या पायाभूत कामांना सौंदर्यात्मक रुप बहाल करणारा आणि सकारात्मक भावना निर्माण करणारा असा मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्प हा प्रशासनासाठी आणि राज्य सरकारसाठी देखील जिव्हाळ्याचा प्रकल्प आहे. त्यामुळे त्याची कार्यवाही वेळेवर होईल अशा दृष्टीने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन लवकरात लवकर कामे सुरु करावीत, असे निर्देशही भिडे यांनी दिले आहेत.
No comments:
Post a Comment