मराठी पाट्यांच्या अंमलबजावणीला खिळ बसणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 November 2022

मराठी पाट्यांच्या अंमलबजावणीला खिळ बसणार


मुंबई  - मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुकानदारांवर पालिकेने कारवाईचा धडाका सुरु केला असतानाच या कारवाईला न्यायालयाने स्थगित दिली आहे. त्यामुळे पालिकेच्या कारवाईला खिळ बसणार आहे. आतापर्यंत पालिकेने २७ हजार दुकानांची तपासणी केली. यातील सुमारे २२ हजार दुकानांनी मराठी पाट्यांची अंमलबजावणी केली आहे. तर पाच हजार दुकानांनी पाट्या लावल्या मात्र त्या नियमानुसार लावल्य़ा नसल्याने त्यांना कारवाईच्या नोटिसा पाठवण्यात आल्या असल्याची माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ तील कलम ३६ ‘क’ (१)च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम ७ नुसार मराठी भाषेतून ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. याबाबत पहिल्यांदा ३१ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र व्यापारी संघटनांनी कोरोनाचा फटका आणि आर्थिक कारण देत तीन वेळा मुदत वाढवून घेतली होती. ही अंतिम मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली. यादरम्यान, व्यापारी संघटनांनी पालिकेच्या कारवाईच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. मात्र याबाबत न्यायालयाकडून पालिकेला कोणत्याही सूचना आल्या नसल्याने पालिकेने १० ऑक्टोबरपासून सर्व २४ वॉर्डमध्ये कारवाईला सुरू केली. मुंबईत सुमारे साडेपाच लाख दुकाने आहेत. पालिकेने आतापर्यंत २७ लाख दुकानांची तपासणी केली. यात सुमारे २२ हजार दुकानांनी मराठी पाट्यांची अंमलबजावणी केल्याचे आढळले. तर ५ हजार दुकानांनी मराठी पाट्या लावल्या पण त्या नियमानुसार लावल्या नाहीत. म्हणजे अर्धी अक्षरे मराठी, हिंदी व इंग्रजीत असलेले फलक लावण्यात आले. नियमानुसार ठळकपणे मराठीत पाट्या असणे बंधनकारक असल्याने अशा दुकानांवर पालिकेने कारवाईच्या नोटिसा पाठवल्या आहेत. मात्र व्यापारी संघटना या विरोधात न्यायालयात गेल्याने न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पालिकेची ही कारवाई थांबली असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad