मुंबई - मुंबई महापालिकेकडून कोरोनाच्या प्रसाराचा शोध घेण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या जात आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या २३४ नागरिकांच्या चाचण्यांमध्ये १६५ रुग्ण ओमायक्रॉन व्हेरिएन्टचे तर ६९ रुग्ण ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंट असलेल्या XBB व XBB.1 व्हेरियंटचे आहेत. मुंबईमध्ये XBB व XBB.1 सब व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले असले तरी त्यामुळे रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या वाढलेली नाही. त्यामुळे मुंबईकर नागरिकांनी घाबरु नये. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे तसेच गर्दीच्या ठिकाणी ‘मास्क’चा स्वेच्छेने वापर करावा असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार सुरु झाला. तेव्हापासून मुंबईमध्ये कोरोनाच्या ४ लाटा आल्या. कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंट आणि सब व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढली आहे याचा शोध घेण्यासाठी ऑगस्ट २०२१ पासून जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या जात आहेत. नुकतीच १ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर दरम्यान २३४ कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात सर्व १०० टक्के अर्थात २३४ नमुने हे ओमायक्रॉन व्हेरिएन्टचे आहेत. यातील १५ टक्के अर्थात ३६ नमुने हे ओमायक्रॉच्या एक्सबीबी (XBB) या सब व्हेरियंटचे आहेत. तर १४ टक्के म्हणजेच ३३ नमुने हे एक्सबीबी.१ (XBB.1) या सब व्हेरियंटचे आहेत. १६५ रुग्ण ओमायक्रॉन व्हेरिएन्टचे तर ६९ रुग्ण ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंट असलेल्या XBB व XBB.1 चे आहेत.
विविध सब व्हेरियंटची होणारी लागण लक्षात घेता, ‘कोविड - १९’ विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने लसीकरण पूर्ण करुन घेणे, गर्दीच्या ठिकाणी ‘मास्क’चा स्वेच्छेने वापर, नियमितपणे व योग्य प्रकारे साबण लावून हात धुणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात. ओमायक्रॉनच्या XBB व XBB.1 सब व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले असले तरी त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याचे तसेच मृत्यूची संख्या वाढल्याचे समोर आलेले नाही. यामुळे मुंबईकर नागरिकांनी घाबरु नये. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आवश्यक तेथे योग्य पालन करावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment