![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEibxe0ipDNxq5-wHD-7A_VAKO6UxfKc4b21Zmrzlpa_1nkIX6dQ4zioZtPibuW2Ge1zNXONcZrNQ6iZ7orDtJ857RzvGSCr1dT5ZHSSBEvy24LNdNfF-479exkw-akI2GWKU9RauDYVJ0gvaU_pq4WoN7C7pCsORGv2zhvl86yjiSabM7y8W0fSgqeC/w640-h392/andheri%20gokhale%20bridge.jpeg)
मुंबई - गोखले पुल बंद केल्याने पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. त्यामुळे या पुलाचे काम काम युद्ध पातळीवर सुरू व्हावे यासाठी स्थानिक पातळीवर मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेनेही पुलाचे काम वेगाने सुरू करण्यासाठी तयारी केली आहे. पुल तातडीने पाडण्याचे काम पालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे. तर रेल्वेच्या अखत्यारीतील कामदेखील पालिकेक़डूनच केले जाणार आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये अंधेरीच्या गोखले पुलावर एका लेनवरून वाहतूक सुरू करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली.
मुंबई आयआयटीकडे गोखले ब्रीजच्या कामासाठीचे डिझाईन मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत. या डिझाईनला आयआयटीने मंजुरी दिल्यानंतर त्यानुसार ब्रीजच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया सुरू होईल. या ब्रीजवर सुरूवातीला पालिकेच्या अखत्यारीतील २६५ मीटर अंतरामध्ये तोडकाम करण्यात येईल. त्यानंतर रेल्वेच्या अखत्यारीतील कामासाठी रेल्वेच्या मदतीने याठिकाणच्या कामाला सुरूवात होणार आहे. रेल्वेने पालिककेडे केलेल्या विनंतीनुसार रेल्वेच्या अखत्यारीतील बांधकामही पालिका करणार आहे. त्यामुळे या ९० मीटरच्या अतिरिक्त कामासाठी पालिका निविदा प्रक्रिया राबवणार आहे. पुढच्या महिन्याभरात ही निविदा प्रक्रिया सुरू होईल असेही वेलरासू यांनी सांगितले.
पालिकेने याआधी दोन टप्प्यात गोखले पुलाचे काम हाती घेण्याचे निश्चित केले होते. पालिकेच्या अखत्यारीतील टप्प्याचे २६५ मीटरचे काम हे पहिल्या टप्प्यात अपेक्षित होते. तर दुसऱ्या टप्प्यातील कामामध्ये रेल्वेच्या अखत्यारीतील आणि दुसऱ्या लेनचे काम होणार होते. या दोन्ही कामासाठी साधारणपणे चार वर्षांचा कालावधी अपेक्षित होता. परंतु पुलाच्या तपासणीसाठी नेमण्यात आलेल्या एससीजी कन्सलटन्टने दिलेल्या अहवालाने या कामाला वेग आला आहे. सल्लागाराने चार वर्षाचे काम दोन वर्षात करण्याचा सल्ला दिल्यानेच हे काम वाहतूक विभागाकडून हाती घेण्यात आले. वाहतूक विभागाने नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे आता दोन्ही टप्प्यातील काम एकत्रितपणे केले जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी १६१ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मेट्रोच्या प्रवासी क्षमतेत वाढ -
अंधेरीचा गोखले ब्रीज बंद झाल्याने या वाहतुकीचा भार आता मेट्रोवर येताना दिसून येत आहे. सोमवारी मेट्रोवर पहिल्याच दिवशी ११ हजार प्रवाशांची अतिरिक्त अशी भर पडली. आझाद नगर मेट्रो स्थानकातील प्रवाशांची वाढ २६ टक्क्यांनी वाढली. तर वर्सोवा, डी एन नगर या स्थानकांवरील प्रवाशांच्या संख्येत १७ टक्क्यांनी वाढ झाली, अशी माहिती मुंबई मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.
पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडी-
धोकादायक म्हणून जाहिर करण्यात आलेला अंधेरी- पूर्व - पश्चिमेला जोडणारा गोखले पूल अखेर वाहतुकीसाठी सोमवारपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी एस व्ही. रोडसह अंधेरी पूर्व व पश्चिम परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनचालकांना ३० ते ४० मिनिटांचा वेळ वाया गेला.
No comments:
Post a Comment