मुंबई - अंधेरी पूर्व आणि पश्चिम जोडणारा गोखले पूल बंद केल्यानंतर पहिल्याच दिवशी पश्चिम उपनगरात वाहतुकीची कोंडी झाली. यावर पर्याय म्हणून या परिसरात नो पार्किंग जाहीर करावे व वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक मार्शलची नियुक्ती करावी यासह अनेक पर्याय स्थानिक माजी नगरसेवकांनी महापालिका आणि सहार व वाकोला वाहतूक पोलिस विभागाला दिले आहेत.
गोखले पूल धोकादायक घोषित करण्यात आल्यामुळे तो पाडून नवीन पूल उभारण्यात येणार आहे. सोमवारी हा पूल बंद करण्यात आल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडतो आहे. वाहन चालकांचाही गोंधळ उडतो आहे. एस. व्ही. रोडसह अंधेरीतील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रण व्यवस्थापनासाठी भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक अभिजीत सामंत यांनी पालिका सहाय्यक आयुक्त के पूर्व व वरिष्ठ वाहतूक निरीक्षक वाकोला विभाग आणि सहार विभाग यांना पत्र पाठवून त्यांचे लक्ष वेधले आहे. यात वाहतुकीवर पर्याय म्हणून शहाजी राजे रोड, महात्मा गांधी मार्ग, हनुमान रोड सहार रोडवर सकाळी आठ ते १२ आणि संध्याकाळी पाच ते नऊ या कालावधीसाठी नो पार्किंगसाठी सुचवले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा येणार नाही. वाहतुकीच्या नियमनाकरीता शहाजी राजे रोडवरील कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपूल तसेच शहाजी राजे रोडला जोडणारा इंदुलकर मार्ग व वीर बाजीप्रभू देशपांडे मार्ग, सहार रोडवरील गरवारे चौक, पार्लेश्वर मंदिर, गोकुळ नाका येथे देखील याच वेळी वाहतूक मार्शल नेमले जावेत. विलेपार्ले पूर्व आणि अंधेरी पूर्वेला किमान १२ ठिकाणी वाहतूक मार्शल तैनात करणे आवश्यक आहे, अशी त्यांनी म्हटले आहे.
या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहने सोडलेली असतात. त्यामुळे या विभागात वाहतूक कोंडी होत असते. ही वाहने उचलून जप्त करण्यात यावी. अंधेरी पूर्वेला ऑटो रिक्षाच नियंत्रित केली जाईल, याची खबरदारी घ्यावी. ऑटो थांबण्यासाठी आणि प्रवासासाठी रेल्वे स्थानक परिसर वापरावा. आगरकर चौकात रिक्षांची गर्दी होते ती टाळावी व प्रवाशांना स्थानकाबाहेर येताच रिक्षा मिळावी; म्हणजे बाहेरील गर्दीतून सुटका होईल. पदपथ आणि रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई अपेक्षित आहे. विशेषतः शहाजी राजे रोड, सहार रोड, अंधेरी स्टेशन जवळ आणि नागरदास रोड येथे फेरीवाल्यांचे नियमन करावे. तसेच सहार जंक्शन येथे अंधेरी बाजूकडून पार्ले दिशेला महामार्गावर उजवे वळण नाही, ही बाब लक्षात घेऊन पालिका व वाहतूक पोलिसांनी नियोजनासाठी पावले उचलावीत असे आवाहन पत्रात करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment