११२ वर्षे जुन्या पुलाच्या दगडांनी ऑगस्ट क्रांती मैदानाच्या प्रवेशद्वाराला नवे रुप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 April 2023

११२ वर्षे जुन्या पुलाच्या दगडांनी ऑगस्ट क्रांती मैदानाच्या प्रवेशद्वाराला नवे रुप


मुंबई - मुंबईतील वाहतूक सुलभ करणारे बहुतांश पूल हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित आहेत. यापैकी अनेक पुलांनी आपल्या वयाची शंभरी पार केली आहे. ब्रिटीशकालीन दगडांचे जतन व पुनर्वापरासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. रे-रोडच्या ११२ वर्षे जुन्या रेल्वे पुलाचा पुनर्विकास बृहन्मुंबई महानगरपालिकेने  सध्या हाती घेतला आहे. पुनर्विकासादरम्यान काढण्यात आलेले पुलाचे दगड हे टाकून देण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर मुंबईचे ऐतिहासिक वैभव असणा-या आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणास्थान असणा-या ऑगस्ट क्रांती मैदानाच्या प्रवेशद्वारासाठी करण्यात आला आहे. यामुळे ऑगस्ट क्रांती मैदानाच्या प्रवेशद्वाराला ऐतिहासिक रुपडे प्राप्त झाले आहे.

रे रोड पुलाच्या कामादरम्यान ब्रिटिशकालीन वास्तुकलेचा नमुना असलेले सुंदर बांधकाम जेसीबीच्या एका फटकार्‍यात जमिनदोस्त होऊ शकले असते. परंतु, तेथील ऐतिहासिक आणि कलात्मक दगड जतन करण्याच्या उद्देशाने आणि पुरातन वास्तूजतन कक्षाने अत्यंत विचारपूर्वक व काळजीपूर्वक केलेल्या कार्यवाहीमुळे सदर दगडी खांब जसेच्या तसे दुसरीकडे उभे करण्याची किमया प्रत्यक्षात आली आहे. ऑगस्ट क्रांती मैदानासारख्या ऐतिहासिक संदर्भ असलेल्या जागेच्या ठिकाणी या शतकपूर्ती करणा-या ब्रिटीशकालीन दगडांचा पुनर्वापर करण्यात आला आहे. 

गतवर्षी पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यात रे-रोड पुलाच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पास सुरूवात झाली. त्याचवेळेस ऑगस्ट क्रांती मैदानाच्या जिर्णोद्धार व संवर्धनाचे काम देखील सुरू होते. त्यामुळे रे-रोड पुलाच्या दगडी खांबांना पुन:र्स्थापित करण्याचा निर्धार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू जतन खात्याने केला. त्यानंतर नियोजनबद्धरित्या व शास्त्रोक्त पद्धतीने खांबांच्या दगडांना व्यवस्थित क्रमांक देऊन, एक-एक दगड काळजीपूर्वक सुटा करण्यात आला. हे सर्व दगड ऑगस्ट क्रांती मैदानाच्या कामाच्या ठिकाणी नेण्यात आले व पुन्हा एकदा हे खांब पूर्वी जसे होते, तसेच उभे करण्यात आले. फक्त आता त्या दगडांचे ठिकाण वेगळे होते. या अतिशय नियोजनबद्ध आणि अचूक पद्धतीच्या कामामुळे ऑगस्ट क्रांती मैदानाच्या प्रवेशद्वाराला एक ऐतिहासिक रुपडे प्राप्त झाले आहे.  

या कामासाठी पुरातन वास्तू जतन सल्लागार व वास्तू रचनाकार (आर्किटेक्ट) पंकज जोशी यांनी सल्लागार म्हणून काम पाहिले. तर कंत्राटदार सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रा.लि. यांच्या कुशल कारागिरांनी सदर काम योग्यप्रकारे पार पाडले आहे. पुरातन वास्तू जतन कक्षामार्फत जिर्णोद्धार करण्यात आलेले ऑगस्ट क्रांती मैदानाचे हे प्रवेशद्वार म्हणजे इच्छाशक्तीच्या व कल्पकतेच्या जोरावर उत्तम काम करता येते, याचे जिवंत उदाहरण असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad