खड्डे लवकरात लवकर भरा, पालिकेचे अधिकाऱ्यांना निर्देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 July 2023

खड्डे लवकरात लवकर भरा, पालिकेचे अधिकाऱ्यांना निर्देश


मुंबई - सततच्या पावसामुळे तयार होणारे खड्डे लवकरात लवकर भरावेत, खड्डे भरण्यासाठी विभाग कार्यालय स्तरावर मंजूर केलेल्या निधीचा पुरेपूर वापर करावा. खड्डे भरण्यासाठी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट, कोल्ड मिक्स, मास्टिक यापैकी योग्य त्या पद्धतीचा अवलंब करावा. सध्या पावसाने उघडीप दिली असल्याने या कालावधीत अधिकाऱ्यांनी आणि अभियंत्यांनी आपआपल्या विभागात रस्त्यांची दिवसा पाहणी करावी. तसेच लगोलग रात्रीच्या वेळेत खड्डे बुजवण्यासाठी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरातील रस्त्यांवर पावसामुळे तयार झालेल्या खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घ्यावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना दिले आहेत. तसेच रस्त्यांवर पावसाने झालेले खड्डे तातडीने भरुन वाहतूक सुरळीत राहील, नागरिकांना दिलासा मिळेल, अशारितीने प्रशासनाने पावले उचलावी व कामांचे नियोजन करावे, असे निर्देश मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिकेला दिले आहेत. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाने, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सर्व संबंधित यंत्रणेची महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक ३१ जुलै २०२३) तातडीने बैठक घेऊन कार्यवाहीला वेग देण्याच्या दृष्टीने सर्व संबंधिताना सूचना केल्या आहेत.

आज झालेल्या बैठकीवेळी, सर्व यंत्रणांसोबत समन्वय साधणे महत्त्वाचे असल्याने त्याकडेही सर्व संबंधितांनी लक्ष पुरवावे, असे वेलरासू म्हणाले. कॉंक्रिट रस्ते आणि डांबराचे रस्ते तसेच दोन रस्त्यांमधील पॅच हे रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटने भरून पुनर्पृष्टीकरण करण्यात यावे, तसेच प्रकल्प रस्त्यांसाठीही रॅपिड हार्डनिंग काँक्रिटचा वापर करावा, असे वेलरासू यांनी सांगितले.

खड्डे बुजवण्यासाठी पथक तयार करा-
प्रत्येक विभागाच्या स्तरावर सहायक आयुक्त हे खड्डे बुजवण्यासाठीच्या कामाचे समन्वय अधिकारी (नोडल) म्हणून कामकाम सांभाळतील. विभागस्तरीय रस्ते अभियंता आणि कार्यकारी अभियंता हे आपल्या कामाचा पूर्तता अहवाल सादर करतील. दिवसा खड्ड्यांची पाहणी करून रात्रीच्या वेळेत खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात येईल. विशेष पथकं तयार करून खड्डे बुजण्याची कामे युद्ध पातळीवर करण्यात येईल. रस्ते अभियंत्यांसोबत सर्व पथकं पावसाळ्याच्या काळात प्रत्यक्ष क्षेत्रावर (ऑनफिल्ड) कार्यरत राहतील, याची जबाबदारी सहायक आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. या दुय्यम अभियंत्यांच्या देखरेखीखाली मास्टिक रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीचा वापर करून खड्डे बुजवण्यात येणार आहेत.

यंत्रणांशी समन्वय साधून खड्डे बुजवावेत -
मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरातील खड्ड्यांच्या तक्रारी प्रामुख्याने प्रकल्प रस्त्यांबाबतचे आहेत. प्रकल्प रस्त्यांबाबतीत परिरक्षणाबाबतीत कसूर करणाऱया कंत्राटदारांवर प्रसंगी दुप्पट दंड आकारणी, कठोर कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारख्या विविध प्राधिकरणांसोबत समन्वय साधून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येतील, यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. तसेच कोणत्याही प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्त्याबाबत तक्रार असली तरीही खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा मिळेल, यासाठी प्राधान्य द्यावे, या स्वरुपाच्या कामांचा खर्च संबंधित यंत्रणांकडून घेण्यासाठी नंतर परतावा शुल्क वसुली सादर करता येतील, असेही वेलरासू यांनी स्पष्ट केले.

खड्डे भरण्यासाठी सध्या कोल्डमिक्स, मास्टिक एजन्सी आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रिट अशा तीन पद्धतीमधून काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची रूंदी किती आहे, कोणाच्या हद्दीतील किंवा कोणाच्या मालकीचा रस्ता आहे, या बाबी तूर्त मागे ठेवून सर्व खड्डे बुजवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व उन्नत महामार्ग याठिकाणी रस्त्यांची स्थिती चांगली आहे. त्यासोबतच मुंबईतील सर्व मुख्य रस्ते आणि सेवा रस्ते याठिकाणीही खड्डे राहणार नाहीत, यासाठी काळजी घेण्याच्या सूचनाही वेलरासू यांनी केल्या.

पावसाळ्याच्‍या काळात कचरा संकलन व वहन अधिक क्षमतेने करावे-
मुंबई शहर आणि उपनगरात मोठया प्रमाणात घनकचऱयाच्या तक्रारींचा निपटारा करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला सूचना केल्या आहेत. पावसाळ्याच्‍या काळात कचऱयाची योग्‍यपणे विल्‍हेवाट लावावी, कचरा संकलन व वहन अधिक क्षमतेने करावे, असे निर्देशही अतिरिक्‍त आयुक्‍त वेलरासू यांनी सर्व उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त आणि घनकचरा व्‍यवस्‍थापन खात्‍यास दिले. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या निर्देशानुसार बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने मुख्‍यमंत्री स्‍वच्‍छ मुंबई व्‍हॉटसऍप हेल्‍पलाईन सुरू केली आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणच्‍या कचरा विषयक तक्रारींची नोंद ८१६९६८१६९७ या हेल्‍पलाईन क्रमांकावर नोंदविली जात आहे. संबंधितांनी छायाचित्र आणि ठिकाण यांची माहिती पाठविल्‍यास तत्‍काळ त्‍याचे निराकरण केले जात आहे. पावसाळ्यात कच-याविषयक समस्‍या उद्भवू शकतात. संभाव्‍य परिस्थिती विचारात घेता सर्व यंत्रणांनी समन्‍वयाने कचरा समस्‍या मार्गी लावावी. अधिक मनुष्‍यबळचा वापर करत, प्रसंगी वाहनांच्‍या फे-या वाढवून कचरा संकलन आणि वाहतूक अधिक क्षमतेने करावी. अधिका-यांनी आपापल्‍या विभागात आकस्मिक भेट देऊन पाहणी करावी. जागच्‍या जागी समस्‍येचे निराकरण करावे, असेही वेलरासू यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad