Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

उबाठा गटाच्या खासदारांवर कारवाई करणार' - खासदार राहुल शेवाळे


मुंबई (जेपीएन न्यूज) - नव्या संसद भवनात मांडल्या गेलेल्या पहिल्याच ऐतिहासिक विधेयकाच्या म्हणजेच नारी शक्ती वंदन अधिनियम २०२३ च्या मतदानावेळी लोकसभेत अनुपस्थित राहिलेल्या उबाठा गटाच्या चार खासदारांवर कारवाई करण्याचा इशारा शिवसेनेचे लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी दिला. शिवसेनेने व्हीप बजावूनही तो या खासदारांनी डावलल्याने ही कायदेशीर कारवाई होईल, असं शेवाळे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव अशी या चार खासदारांची नावं आहेत. या चारही खासदारांचे निलंबन करण्याबाबत आपण कायदेशीर सल्ला घेत असून लोकसभा अध्यक्षांनाही निवेदन देणार असल्याचं शेवाळे यांनी स्पष्ट केलं.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसप्रणीत आघाडीतील सर्व खासदारांनी महिला आरक्षण विधेयकाला समर्थन दिल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, हे अर्धसत्य आहे. त्यांच्या आघाडीतील अनेक खासदार विधेयकाच्या मतदानादरम्यान सभागृहात गैरहजर होते, असं शेवाळे यांनी सांगितलं. खासदार भावना गवळी या लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद आहेत. त्यांनी जाहीर केलेला व्हीप शिवसेनेच्या सर्व खासदारांसाठी बंधनकारक असतो. १८ ते २२ सप्टेंबर रोजी घेतलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याचा व्हीप भावना गवळी यांनी जाहीर केला होता. मात्र उबाठा गटाच्या या चार खासदारांनी अनुपस्थित राहून या व्हीपचे उल्लंघन केले, असा ठपका शेवाळे यांनी ठेवला.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच महिला आरक्षणाचं समर्थन केलं होतं. पण त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेत असल्याचा दावा करणारे हे चार खासदार महिला आरक्षण विधेयकावर मतदान झालं, त्या वेळी गैरहजर होते, ही लाजिरवाणी बाब आहे. ओमराजे निंबाळकर हे तर दिल्लीत असूनही सभागृहात आले नाहीत, हे दुर्दैवी आहे, असंही शेवाळे म्हणाले. महिलांचा अवमान करणाऱ्यांना जनताच जागा दाखवून देईल, असं सांगत खासदार शेवाळे यांनी अनेक वर्षे प्रलंबित असलेले हे विधेयक सभागृहात मांडण्याची इच्छाशक्ती दाखवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom