मुंबई - मुंबई महापालिका ही स्वायत्त संस्था असून सध्या पालिकेचा कारभार भाजप हाकत आहे. पालकमंत्र्यांना मुख्यालयात दालन उपलब्ध केले म्हणजे भाजपने कार्यालय थाटले, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. तसेच निधी वाटपात दुजाभाव करण्यात आला आहे. समान निधी वाटप न झाल्यास पालिकेच्या वॉर्ड स्तरावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दानवे यांनी यावेळी दिला.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सह शिवसेना उबाठा पक्षाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, कामगार नेते सुहास सामंत, माजी नगरसेवक सचिन पडवळ आदी मान्यवरांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते. यावेळी दानवे यांनी पालकमंत्र्यांच्या दालनाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. पालकमंत्र्यांच्या नावाखाली भाजपने मुंबई महापालिका मुख्यालयात आपले कार्यालय थाटले आहे. पालकमंत्र्यांना पालिका मुख्यालयात दालन मिळत असेल तर विरोधी पक्षनेता म्हणून आपल्यालाही दालन मिळावे, यासाठी आपण आग्रही आहोत असे दानवे म्हणाले.
७ मार्च २०२२ रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि मुंबई महापालिकेत प्रशासकीय राज्य आहे. मुंबई महापालिका ही स्वायत्त संस्था असली तरी सध्या पालिकेचा कारभार भाजप हाकत आहे. त्यामुळे निधी वाटपात दुजाभाव करण्यात आला. निधी वाटपात भाजपला झुकते माप देत, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात निधी दिलेला नाही. याविषयी पालकमंत्र्यांची भेट घेणार असून योग्य निर्णय न झाल्यास पालिकेच्या वॉर्ड स्तरावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दानवे यांनी यावेळी दिला.
No comments:
Post a Comment