मास्क वापरा सांगणाऱ्या बातम्या चुकीच्या, महापालिकेचे स्पष्टीकरण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मास्क वापरा सांगणाऱ्या बातम्या चुकीच्या, महापालिकेचे स्पष्टीकरण

Share This

मुंबई - मुंबईमधील हवा प्रदूषित झाली आहे. प्रदूषण वाढल्याने नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलंय. अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र या बातम्यांमध्ये करण्यात आलेले मास्क वापरण्यासंदर्भातील आवाहन चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे. प्रदूषणाबाबत यथोचित उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

वातावरण बदलामुळे बृहन्मुंबई सह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर सध्या विपरीत परिणाम आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांमध्ये आणि समाजमाध्यमात वेगवेगळ्या स्वरूपाचे वृत्त प्रकाशित झाले आहे. या वृत्तांमध्ये नमूद केले आहे की, ‘नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने आवाहन केले आहे.’ याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येते की, हवेची गुणवत्ता विपरित होत असल्याचे आढळल्यानंतर या अनुषंगाने शासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाय योजनांविषयी कार्यवाही विचाराधीन आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मास्क वापरण्यासंदर्भात नागरिकांना कोणतेही आवाहन करण्यात आलेले नाही किंवा मार्गदर्शक तत्वेही अद्याप जारी करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे, प्रसारमाध्यमे व समाज माध्यमांमधून बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उल्लेख करुन प्रकाशित किंवा प्रसारित केलेले वृत्त निराधार व अयोग्य आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हवामान आणि तत्संबंधीत सर्व यंत्रणांशी बृहन्मुंबई महानगरपालिका समन्वय साधत असून त्यांच्याकडून प्राप्त निर्देशांनुसार यथोचित उपाययोजना, निर्णय, आदींची माहिती नागरिकांपर्यंत वेळोवेळी पोहोचविण्यात येईल, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages