Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Mumbai News - मुंबईकरांची पावसाळ्यात गैरसोय होणार नाही यासाठी उपाययोजना करा - डॉ. भूषण गगराणी


मुंबई - पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करावीत. पावसाळी पाण्याचा जलद निचरा होत राहील, याची दक्षता घ्यावी. अद्ययावत संसाधनांचा वापर करून रस्त्यांवरील खड्डे भरावेत, आपत्कालीन संवाद यंत्रणा अधिक प्रभावी करावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी दिले. मध्य व पश्चिम रेल्वे, मेट्रो, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांसारख्या सर्व शासकीय यंत्रणांसमवेत समन्वय साधून मुंबईकर नागरिकांची पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी नमूद केले. (Take measures so that Mumbaikars are not inconvenienced during monsoons)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी आज (दिनांक २१ मार्च २०२४) पर्जन्य जलवाहिनी, रस्ते आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे कार्य आणि पावसाळा पूर्वतयारी आदींचा आढावा महानगरपालिका मुख्यालयात घेतला. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमीत सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, संचालक, सहायक आयुक्त, प्रमुख अभियंता, खातेप्रमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते. सर्व संबंधित खात्यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे कामांची माहिती सादर केली. 

त्यानंतर मार्गदर्शन करताना आयुक्त डॉ. गगराणी म्हणाले की, पावसाळी उपाययोजनांमध्ये नाल्यांचे खोलीकरण करून गाळ काढण्यात यावे. नदी, नाले परिसरातील रहिवासी भागांत पावसाचे पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. सखल भागांमधील उदंचन केंद्राची यंत्रणा सातत्याने सजग ठेवावी. मुंबई महानगरात सिमेंट कॉंक्रिट रस्त्याची कामे, द्रुतगती मार्गाची कामे, नियोजित रस्त्यांची कामे विविध ठिकाणी सुरू आहेत. या कामांमुळे नागरिकांची पावसाळ्यात गैरसोय होणार नाही, याबाबतचे नियोजन करताना कामांचे प्राधान्यक्रम ठरवावे. तसेच रस्त्यांची ठिकठिकाणी सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करावीत. खड्डे भरण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून वाहतुकीच्या दृष्टीने नागरिकांना दिलासा देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देशही गगराणी यांनी दिले. 

मुंबईतील आपत्कालीन व्यवस्थापन ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी होऊ नये, यासाठी विहित प्रक्रियेनुसार संबंधित इमारती निर्मनुष्य कराव्यात. जुहू चौपाटी परिसरात निगराणी मनोऱ्यांची संख्या वाढवावी, तसेच आपत्कालीन संवाद यंत्रणा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही आयुक्तांनी दिले. 

विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक डॉ. गगराणी यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ.  अश्विनी जोशी, डॉ. अमीत सैनी, अभिजित बांगर, डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील नियंत्रण कक्षाला भेट देऊन विविध आपत्कालीन उपाययोजनांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom