'ॲनिमियामुक्त मुंबई' अभियान संपूर्ण मुंबईत राबवणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'ॲनिमियामुक्त मुंबई' अभियान संपूर्ण मुंबईत राबवणार

Share This

मुंबई - मुंबईत ॲनिमिया आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी 'ॲनिमियामुक्त मुंबई' हे अभियान राबविण्यात येणार आहे. यंदा या अभियानासाठी 'लाल रंग कमाल रंग' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. ॲनिमिया आजाराबाबत सर्व वयोगटातील महिलांमध्ये जनजागृती करणे, हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. ( 'Anemia Free Mumbai' campaign)

बृहन्मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ॲनिमियामुक्त मुंबई अभियानासाठी बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान यांनाही अभियानात सहभागी करून घेतले आहे. स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या अभियानाचा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते (दिनांक १५ ऑगस्ट २०२४) प्रारंभ करण्यात आला. 

महिलांच्या सुदृढ आरोग्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून नियमितपणे आरोग्य सुविधा पोहचतील, यासाठी यंत्रणा अधिक सक्षम आणि कार्यरत करण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत. प्रामुख्याने किशोरवयीन मुली आणि महिलांमध्ये आढळणाऱ्या ॲनिमिया आजारासाठी चाचणी, औषधोपचार आणि सल्ला नियमितपणे उपलब्ध होईल यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  अभिजीत बांगर यांनी देखील दिल्या आहेत. 

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनी घोषित केल्यानुसार ॲनिमिया (रक्तक्षय) ही जागतिक पातळीवर भेडसावणारी आरोग्याची समस्या आहे.  भारतात प्रामुख्याने तरूण मुली, मासिक पाळी येणाऱ्या किशोरवयीन मुली, गरोदर स्त्रिया आणि प्रसुती झालेल्या स्त्रियांमध्ये ॲनिमिया हा आजार आढळून येतो. ॲनिमियामुळे रक्तातील हिमोग्लोबिनवर परिणाम होतो. परिणामी रक्तातील प्राणवायू (ऑक्सिजन) वहन क्षमतेवर परिणाम होतो. महिलांच्या शारीरिक रचनेनुसार मासिक पाळी आणि प्रसुती यासारख्या बदलांमुळे निघून जाणाऱ्या रक्ताचा परिणाम हा हिमोग्लोबिनचे रक्तातील प्रमाण कमी होण्यावर होतो. तसेच दगदगीची जीवनशैली व अनियमित आहाराच्या सवयी सुद्धा ॲनिमियासाठी कारणीभूत असतात.

ॲनिमिया मुक्त मुंबई अभियानात सहभागी होत असलेल्या अभिनेत्री सोहा अली खान यांनी ॲनिमिया आजाराबाबतच्या जनजागृतीसाठी चित्रफितीच्या माध्यमातून संदेश देताना हिरव्या पालेभाज्या, लिंबू, आवळा व जीवनसत्व सी युक्त फळे खाण्याचे सुचवले आहे. तसेच लोह (आयर्न) आणि फॉलिक अॕसिडयुक्त गोळ्यांचे सेवन डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसारच करावे, असे सुचविण्यात आले आहे.  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व वयोगटातील महिलांना आवाहन करण्यात येत आहे की, नियमितपणे हिमोग्लोबिनची चाचणी करावी. तसेच सर्व महिलांनी आहारामध्ये लोहयुक्त, व्हिटॅमिन सी तसेच इतर पोषणमुल्ये असलेला आहार घ्यावा. बृहन्मुंबई महानगरपालिका दवाखाने आणि आरोग्य केंद्र या ठिकाणी जावून मार्गदर्शन घ्यावे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध आणि गोळ्या घ्याव्यात, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages